
देशाला होतकरू तरुण पिढीची गरज
ठाणे, ता. २३ (वार्ताहर) : यशस्वी जीवनासाठी वाटचाल करताना राज्य आणि देशाचा विकास कसा होईल, या दृष्टीने तरुणाईने विचार करणे आवश्यक आहे. अशा होतकरू तरुण पिढीची सध्या देशाला गरज असून त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी सकाळ यिनच्या ठाणे जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात सोमवारी (ता. २०) करण्यात आले होते. या वेळी स्वच्छता, साफसफाई, कचरा, प्लास्टिक अशा विविध विषयांवर मते मांडताना योगा व ध्यान, आर्थिक साक्षरता, उद्योजकता कौशल्ये, सर्जनशील विचार, भावनिक व मानसिक आरोग्य, सेवा आदी एकूण ६ मूलमंत्रांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच आगामी उपक्रमांचे नियोजनही करण्यात आले.
जिल्हा अधिवेशनात शिक्षण सहायक संचालक शेषराव बडे यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि शिक्षणाने आत्मनिर्भर होण्यासाठी मार्गदर्शन केले. राजकारण हे पैसे कमविण्याचे साधन नसून समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून तरुणांनी विचार केला पाहिजे. म्हणून युवा पिढीने राजकारणात येणे गरजेचे आहे, असे प्रदेशाध्यक्ष प्रवक्त्या मृणाल पेंडसे यांनी पटवून दिले. उद्योजक सुयोग मालुसरे यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र घेऊन ज्यात आपल्याला आनंद वाटतो, ते स्वप्न उराशी बाळगून तेच साध्य करावे, जेणेकरून यशाचा मार्ग मोकळा आणि सुलभ होईल, असे सांगितले.
------------------
जीवनात आपल्याला काय बनायचे आहे, काय शिकायचे आहे. हे लक्षात घेऊन आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. शिक्षण घेऊन मी आत्मनिर्भर झालो तरच देश, राज्य विकास करेल. शिक्षणाने विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते. ज्ञानात भर पडायची असेल, तर पुस्तकवाचन केलेच पाहिजे. आताच्या वयात अवांतर वाचनाची सवय तुम्हाला भविष्यात इतरांपेक्षा चार पावले पुढे जाण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
- शेषराव बडे, शिक्षण सहायक संचालक
-------------------
सकाळ यिन जिल्हास्तरीय अधिवेशनात नव्या पिढीसाठी नेतृत्व विकासाची सुवर्णसंधी दिल्याबद्दल सकाळचे आभार. उद्योगात अनेक आव्हाने असतात. गेल्या बावीस वर्षांपासून आव्हाने झेलत मी व्यवसाय करीत आहे. आजच्या मुलांनी सर्वप्रथम शिक्षण घ्यायला हवे. व्यवसाय हा प्रत्येक गोष्टीत असतो. चांगल्या-वाईट अनुभवावरून माणूस शिकत असतो आणि आपल्या उद्योगाचे साम्राज्य शून्यातून निर्माण करीत असतो.
-सुयोग मालुसरे, उद्योजक
-------------------
राजकारण वाईट नाही. तरुणांनी पुढे यायला हवे. राजकारण म्हणजे पैसे कमवण्याची स्त्रोत नाही. राजकारणात काम करत असताना किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांना प्रशासनाचे चांगले वाईट अनुभव येतात. राजकारणात एकदम कडक राहूनही चालत नाही. संयम हवा असतो, मग अधिकारी वर्गही सहकार्य करतात. आजच्या स्थितीला सोशल मीडिया हा खूप महत्त्वाचा भाग आहे. संधीचे सोने कसे करायचे हे समजून घ्या.
- मृणाल पेंडसे