मुंबईतील टँकर गैरव्यवहाराची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील टँकर गैरव्यवहाराची चौकशी
मुंबईतील टँकर गैरव्यवहाराची चौकशी

मुंबईतील टँकर गैरव्यवहाराची चौकशी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मुंबईतील टँकरच्या पाण्यात होत असलेल्या गैरव्यवहाराची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगर विकास खात्यातर्फे मंत्री उदय सामंत यांनी केली. भाजप आमदार ॲड. आशीष शेलार यांनी मुंबईतील पाण्याची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर सामंत यांनी ही घोषणा केली.

मुंबईत दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर २४×७ पाण्याचा प्रकल्प राबविण्यात आला; त्यात मुलुंड आणि वांद्रे पश्चिमची निवड करण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प अयशस्वी ठरले. यासाठी १५० कोटी रुपये सल्लागाराला देण्यात आले; तर २५० कोटी कंत्राटदाराला म्हणजे जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करूनही हा प्रकल्प महापालिका यशस्वी करू शकली नाही. उलट वांद्रे पश्चिम येथे जे पाणी मिळत होते त्याच्या वेळेत आणि पाण्याच्या दाबातही बदल करून ते कमी केले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. वेळापत्रकातील बदलानुसार किमान १८ ते २० तास पाणी देणार का, असा प्रश्न आमदार ॲड. शेलार यांनी उपस्थित केला.

मुंबईत गळतीमुळे ३० टक्के म्हणजे ५०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. हे पाणी वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणार का, मुंबईत १,९०० हजार विहिरी असून त्यामध्ये १२,५०० बोअरवेल आहेत. केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, एका बोअरवेलमधून टँकरद्वारे ८० कोटींच्या पाण्याची चोरी होते. याचा अर्थ मुंबईत १० हजार कोटींचा पाण्याचा घोटाळा टँकरमार्फत केला जातो. याची चौकशी करणार का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी टँकर पाणी चोरीची चौकशी केली जाईल, वांद्रे पश्चिममधील पाण्याचे वेळापत्रक बदलण्याची सूचना पालिकेला केली जाईल, अशी घोषणा केली.