
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचे निधन
मुंबई, ता. २४ : प्रसिद्ध सिने दिग्दर्शक व लेखक प्रदीप सरकार (वय ६७) यांचे आज (ता.२४) निधन झाले. प्रदीप सरकार हे गेले काही दिवस मूत्रपिंडाच्या समस्येचा सामना करत होते. त्यांचे डायलिसिसही सुरू होते. त्यांच्या शरीरातील पोटॅशियम लेव्हल कमी झाली होती. त्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री मुंबईतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना पहाटे त्यांचे निधन झाले.
दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले. त्यांच्या चित्रपटांचे विषय चौकटीबाहेरचे आणि तितकेच संवेदनशील असत. ते उत्तम ॲड फिल्म मेकरही होते. ‘परिणीता’ या चित्रपटामधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात विद्या बालन, संजय दत्त आणि सैफ अली खान यांनी काम केले आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हेलीकॉप्टर ईला, लागा चुनरी में दाग : जर्नी ऑफ अ वुमन, लफंगे परिंदे, मर्दानी यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. कोल्ड लस्सी और चिकन मसाला, अरेंज्ड मॅरेज अँड फॉरबिडन लव्ह आणि दुरंगा यांसारख्या अनेक वेबसीरिजचे प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना फिल्म फेअरसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.