
छत्रपती शिवाजी महाराज असामान्य नेतृत्व : प्रशांत पाटील
विरार, ता. २५ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य नेतृत्व होते. आजही त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या युद्ध कौशल्याची जगात उजळणी केली जाते. त्यांच्या युद्ध कलेचा अभ्यास केला जातो, असे प्रतिपादन साहित्यिक प्रशांत पाटील यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोकण प्रदेश अंतर्गत, पालघर तालुका शाखेच्या वतीने सातवे छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. यावेळी ते बोलत होते. हे संमेलन स्व. किशोर संखे सभागृह बोईसर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक भूपेंद्र संखे यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि ग्रंथ पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे सुधीर दांडेकर यांनी ग्रंथ वाचनाचे महत्त्व सांगून, वाचन संस्कृती जोपासली पाहिजे, असे
सांगितले. संमेलनाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी खुमासदार शैलीत सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. पालघर जिल्हा सदस्य कवयित्री विद्या गिरधर यांनी उपस्थित राहून संमेलनाला सहकार्य केले.