मुंबईतील उड्डाणपुलांच्या कामांची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील उड्डाणपुलांच्या कामांची रखडपट्टी
मुंबईतील उड्डाणपुलांच्या कामांची रखडपट्टी

मुंबईतील उड्डाणपुलांच्या कामांची रखडपट्टी

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ ः मुंबईतील महत्त्वाच्या अनेक पुलांच्या पुनर्बांधणीची कामे याच वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र त्यातील अनेक पुलांची कामे १० टक्क्यांपासून ६० टक्क्यांपर्यंत झाली असून उर्वरित कामे अपूर्ण आहेत. कोरोना महामारीचा तसेच यंत्रणेच्या दिरंगाईचा फटका या कामांना बसला आहे.
मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील राममंदिर रोड ते रिलिफ रोड येथील विस्तारित पुलाचे काम या वर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे. या पुलाचे काम आतापर्यंत ४५ टक्के काम झाले असून उर्वरित काम बाकी आहे. गोखले पुलाच्या पोहोच मार्गाचे काम दहा टक्केच झाले आहे. माहीम कॉजवे येथील मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण आणि पुनर्बांधणीचे काम दहा टक्के झाले आहे. विद्याविहार रेल्वे स्थानक आणि विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या रुळांवरील उड्डाणपुलाचे काम ५० टक्के झाले आहे. लोअर परळ डिलाईल रोड येथील रेल्वे पुलाचे काम ६० टक्के झाले आहे. मालाड येथील लिंक रोडवरील मिठी चौकी जंक्शन उड्डाणपूल बांधण्याचे काम २० टक्के झाले आहे.
ही सर्व कामे याच वर्षी पूर्ण व्हायला हवी होती; मात्र ती अजूनही अपूर्ण स्थितीत आहेत. आता ही कामे या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. या पुलांच्या कामांसाठी पालिकेने सुमारे ९०० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालिकेच्या रस्ते आणि पूल विभागाने दिली. पुरेशी तरतूद केली, तरीही कामे वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचे दिसून आले आहे. कोरोना महामारीचा उड्डाणपुलांच्या कामाला फटका बसला. कोरोनानंतर प्रशासकीय दिरंगाईमुळेही कामे रखडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलांच्या कामांचा खर्च वाढत आहे.
...
महालक्ष्मी येथील नागरिकांची गैरसोय
महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळचा केशवराव खाडे मार्ग ते सातरस्ता जंक्शन उड्डाणपुलाचे कामही रेंगाळले आहे. या पुलाचे काम पुढच्या वर्षी पूर्ण करण्याचे लक्ष आहे. आतापर्यंत फक्त १० टक्केच काम झाले आहे. त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय झाली आहे. एस. व्ही. रोड, कोरा केंद्र येथील पुलाचे काम पूर्ण झाले असून त्यापुढील पश्चिम द्रूतगती महामार्गाशेजारील पुलाचे काम अपूर्ण स्थितीत आहे.
...
तीन पुलांची होणार पुनर्बांधणी
दादर येथील टिळक रोड आणि रे रोड उड्डाणपूल तसेच भायखळा पूर्वेकडील पूल या तीन पुलांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्या समन्वयाने पालिकेने या पुलांची कामे हाती घेतली असल्याची माहिती रस्ते आणि पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.