Mumbai Traffic Jam
Mumbai Traffic Jamsakal

Mumbai Traffic Jam : पार्किंगचे तीन तेरा

पार्किंगच्या तीनतेरावर टीम ‘सकाळ’ने टाकलेला प्रकाशझोत...

ठाणे : कुणी वाहनांना पार्किंग देता का पार्किंग... अशीच काहीशी अवस्था सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरांची झाली आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या वाढत्या वाहनांसाठी अपेक्षित असलेल्‍या पार्किंग धोरणाला सर्वच महापालिका क्षेत्रांमध्ये ‘लाल सिग्नल’ लागला आहे.

हक्काचे वाहनतळ नाही, त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने बेकायदा तळ ठोकत आहेत. रस्ते अडवल्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत आहे. त्यावर उपाय म्हणून आता वाहतूक विभागाने टोईंगचे जुने हत्यार उपसले आहे. पण असे असले तरी पार्किंगची मूळ समस्या अजूनही तशीच आहे. पार्किंगच्या तीनतेरावर टीम ‘सकाळ’ने टाकलेला प्रकाशझोत...

Mumbai Traffic Jam
Traffic Jam : महत्वाची बातमी! पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प; वाहनांच्या 10 किलोमीटर लांब रांगा

ठाणेकरांची मदार एकाच वाहनतळावर
ठाणे : ठाणे शहराच्या रस्त्यांवर सुमारे २१ लाख वाहनांची वर्दळ असून त्या तुलनेत पार्किंगची व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. या वाहनांना हक्काचे तळ मिळावे यासाठी ठाणे महापालिकेने काही चार पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी गावदेवी भूमिगत पार्किंग सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

मात्र, गांधीनगर येथील पार्किंग स्‍टेशनचे भंगार व पतपेढीने उचलेल्या रिक्षांचे आणि घंटागाड्यांचे आगार बनले आहे. तरगावदेवी भाजीमंडई येथील पार्किंग बंद अवस्थेत असून, नाईकवाडी येथील पार्किंग सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंततरी रस्त्यावरच ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चे धोरण पालिका प्रशासनाने आखले. पण पार्किंग धोरणही लटकले असल्याने शहरात सध्याच्या घडीला तरी एकाच वाहनतळावर सर्व मदार असल्याचे दिसते.


ठाण्यातील गांधीनगर भागात ठाणे महापालिकेने तळ अधिक तीन मजल्याचे वाहनतळ सुरू केले आहे. मागील नऊ वर्षे एकाच ठेकेदाराच्या माध्यमातून हे वाहनतळ सुरू आहे. याठिकाणी दुचाकी, चारचाकी, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा पार्क केल्या जात आहेत. रिक्षा याठिकाणी पार्क होत असल्याने या भागातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासही त्यामुळे मदत झाली आहे.

याठिकाणी दुचाकीसाठी महिनाकाठी २०० रुपये, तीन चाकी अर्थात रिक्षांसाठी ४०० रुपये आणि चारचाकीसाठी देखील ४०० रुपयांच्या आसपास भाडे घेतले जात आहे. मात्र दोन वर्षापूर्वी आलेल्या कोरोनामुळे हे वाहनतळ सध्या भंगारगाड्या, घंटागाडी यांचा अड्डा बनला आहे. जवळजवळ ३० ते ५० रिक्षा या भंगार स्वरुपात येथे मागील कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत.

बँक व पतपेढीमार्फत या रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, त्या याठिकाणी पार्क केल्या जात आहेत. कोरोना काळात औषध फवारणी करण्यासाठी घेण्यात आलेल्या फवारणीच्या इलेक्‍ट्रिक गाड्या देखील याठिकाणी धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे इतर वाहनांना लावण्यासाठी येथे जागाच शिल्लक नसल्याचे दिसत आहे.


२०२० मध्ये वाहनतळाचे काम बंद
ठाणे शहरासह ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने यावर तोडगा म्हणून महापालिकेने गावदेवी भागातील भाजी मंडई इमारतीच्या तळ मजल्यावर २५० ते ३०० दुचाकींच्या पार्किंग क्षमतेचे हे वाहनतळ उभे केले. याठिकाणी ठेकेदाराची नेमणूक करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते.

मात्र, दरवर्षी जागे भाडे दरात दहा टक्के होणारी वाढ परवडत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने २०२० मध्ये वाहनतळाचे काम बंद केले. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्याचबरोबर बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

Mumbai Traffic Jam
Traffic Jam : महत्वाची बातमी! पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प; वाहनांच्या 10 किलोमीटर लांब रांगा

गावदेवी भूमिगत पार्किंगचा दिलासा
ठाणे स्टेशन परिसरातील पार्किंग समस्येवर मात करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत बांधण्यात येत असलेली गावदेवी भूमिगत पार्किंग व्यवस्था ठाणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. या ठिकाणी १३० चारचाकी आणि १३० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मात्र, हे वाहनतळ सुरू व्हावे, यासाठी भाजपच्या प्रवक्‍त्‍या मृणाल पेंडसे, काँग्रेसचे राहुल पिंगळे यांच्यासह विविध पक्षांच्या वतीने हे वाहनतळ सुरू व्हावे, यासाठी आंदोलने केली. पालिका आयुक्तांनाही निवेदने दिली होती.

पालिकेला सोसावा लागतोय भुर्दंड
ठाणे महापालिकेच्या महासभेत झालेल्या ठरावानुसार पालिकेला वाहनतळापोटी ७६ हजारांचे भाडे अपेक्षित होते. परंतु, सध्या पालिकेला महिनाकाठी २१ हजार २३० रुपयांचे भाडे मिळत आहे. त्यामुळे पालिकेला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, मागील कित्येक वर्षापासून एकाच ठेकेदाराच्या माध्यमातून येथे काम केले जात आहे. तसेच या ठिकाणी उभ्या करण्यात येणाऱ्या घंटागाड्यांचे कोणतेही भाडे आकारले जात नसल्याची माहिती येथील कर्मचाऱ्याने बोलताना दिली.

नाईकवाडी पार्किंगसाठी विलंब
गावदेवी भूमिगत वाहनतळ परिसरातील नाईकवाडी परिसरात देखील ८० चारचाकी वाहन उभे राहतील, एवढे वाहनतळ उभारण्यात येत आहे. हे वाहनतळ देखील पालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लगणार आहे.

ठाणे स्थानक परिसरातील पार्किंग समस्येवर मात करण्यासाठी उभारण्यात आलेले ठाणे पालिकेचे वाहनतळ लवकरात लवकर सुरू करावे. त्यामुळे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न निकाली निघणार आहे.
- संजय वाघुले, माजी नगरसेवक, ठाणे पालिका

Mumbai Traffic Jam
Mumbai Traffic Jam : एससीएलआर - एलबीएस कनेक्टिव्हिटीसाठी फ्लायओव्हर

जागोजागी वाहने ....शहर झाले बकाल
रवींद्र खरात, कल्‍याण
कल्याण शहरात लोकवस्ती वाढली, वाहनांची संख्या वाढली. मात्र नियोजन नसल्याने जागोजागी रस्ते सोडा आता पदपथावरही दुचाकी पार्क होऊ लागल्याने शहर दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र हे सुमारे ११६. ८ चौ. किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. नाशिक, पुणे, अहमदनगरकडे प्रवास करणारी वाहने कल्याणमधूनच जातात. कल्याण-शीळ रोड, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण-भिवंडी रोड आदी रस्त्याने कल्याणमध्ये प्रवेश केला जातो. शहाड पूल, दुर्गाडी पूल, पत्री पूल, गांधारी पूल, वालधुनी पूल मार्गाने कल्याणमध्ये प्रवेश केला जातो.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्‍वाचे जंक्शन असतानाही दुसरीकडे उड्डाणपूल, सुसज्ज रस्ते, भव्य वाहन पार्किंग प्लाझा देण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. पालिका वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या ढिसाळ नियोजनामुळे रस्ते आणि पदपथ सर्वसामान्य नागरिकांना चालण्यास उरले नसून, वाहतूक कोंडीमध्ये घुसमट होत आहे.

Mumbai Traffic Jam
Mumbai : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एमईटीचे महत्त्वपूर्ण पाऊल

डोंबिवली शहराची अवस्था याहून वेगळी नाही. केडीएमटी बसच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे डोंबिवलीकरांना रोज शेअर रिक्षा किंवा दुचाकीनेच प्रवास करावा लागतो. त्यातही स्थानक परिसरातील अपुरी पार्किंग व्यवस्था सोडली तर पी-वन, पी- टू नुसार वाहनांना रसत्‍यावरच पार्किंगसाठी आधार घ्यावा लागतो.

एकीकडे आधीच रस्ते अरुंद त्यात वाहने पार्क होत असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नवीन गृहसंकुलांमध्ये आता रहिवाशांसाठी पार्किंगची व्यवस्था होत आहे. मात्र, जुन्या इमारतींमधील रहिवाशांना वाहने पार्क करण्यासाठी जागेअभावी पुन्हा रस्ताच गाठावा लागत आहे. त्यामुळे डोंबिवलीत गेल्या काही वर्षांमध्ये वाहनचोरी, इंधनचोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे.

Mumbai Traffic Jam
Nashik Crime News : घरफोडी, चोरी संशयितांना अटक; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

स्मार्ट पार्किंगची प्रतीक्षा
केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण पश्चिम मधील दीपक हॉटेल समोर सात मजली पार्किंग प्लाझाचे काम सुरू झाले आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हे वाहन तळ खुले झाल्यास २०० हून अधिक कार आणि दोन हजारहून अधिक दुचाकी पार्क करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानक परिसरातील बकालपणा काहीसा दूर होणार असल्याची आशा पालिका अधिकारी वर्गाने व्यक्त केली.

शिस्त काय असते भाऊ ?
वाहनतळ नसल्याने स्टेशन बाहेरील दीपक हॉटेल समोर, वाहतूक पोलिस कार्यालय समोरच दुचाकी पार्किंग करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावले असताना तेथेच दुचाकी पार्किंग होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शिस्त कोणी पाळायची असा सवाल केला जात आहे.

Mumbai Traffic Jam
Pune Traffic : पुणेकर अडकले वाहतूक कोंडीत; देशात सातव्या क्रमांकावर

समस्या ‘जैसे थे’
कल्याण पश्चिममध्ये वेळोवेळी रस्ता रुंदीकरण झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी पदपथावर फेरीवाले आणि दुकानदार यांचे अतिक्रमण दुसरीकडे रिक्षा चालकांच्या बेकायदा ताब्‍यामुळे समस्या ‘जैसे थे’ आहे. यावर तोडगा काढण्यास आरटीओ पालिका आणि वाहतूक पोलिस अपयशी ठरली आहे.

कल्याण पूर्वमध्ये ही अरुंद रस्ते असून, वाहने पार्किंग करण्यास सुसज्ज वाहनतळ नसल्याने नागरिक वाहने रस्त्यावरच पार्किंग करत असल्याने प्रतिदिन वाहतूक कोंडीचा फटका कल्याण पूर्वकरांना बसत असून, पार्किंगची व्यवस्था करण्याच्या मागणीला जोर धरत आहे.

कोंडी दूर करण्याचे प्रयत्न
कल्याण स्थानक परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने वाहने पार्किंग प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहन तळाचे काम अंतिम टप्यात असून ते सुरू झाल्यावर शहरातील पार्किंग प्रश्न काहीसा दूर होईल, अशी माहिती कल्याण वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली .

‘पे अँड पार्किंग’ची संपली क्षमता - श्रीकांत खाडे, अंबरनाथ
अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिमेकडे असलेली वाहनतळे फुल्ल झाली असून वाहने ठेवण्याची तेथील क्षमता संपली आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दुमजली वाहनतळे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कोंडीची समस्या सुटू शकेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

सकाळी कामावर जाण्यासाठी नागरिक आपली दुचाकी वाहने स्थानकात आणतात. वाहनतळ अथवा जागा मिळेल त्याठिकाणी वाहने उभी करून कामावर जातात. त्यासाठी शहराच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहनतळे आहेत. याशिवाय काही खासगी ‘पे अँड पार्किंग’ची सोय आहे. मात्र, ‘पे अँड पार्किंग’ची क्षमता संपल्यामुळे रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो.

वाहतूक कोंडी समस्या दूर करण्यासाठी वाहतूक खात्यातर्फे अंबरनाथ आणि बदलापूर पालिका प्रशासन यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू आहे. वाहतूक कोंडीवर सम आणि विषम तारखांना वाहने उभी करण्याची व्यवस्था करावी, रिक्षा स्टँडना जागा द्यावी याबाबत चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे अंबरनाथला महामार्गाप्रमाणे मुख्य रस्ते सिमेंटचे झाले, रुंदीकरण झाले.

मात्र रेल्वे स्थानक ते शिवमंदिर मार्ग तसेच हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर याशिवाय मटका चौक ते नगरपालिका कार्यालयाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या मध्यभागी रस्ता दुभाजक नाहीत, त्यामुळे सम आणि विषम तारखांना पार्किंगची व्यवस्था करूनही फारसा फरक पडत नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकली नाही.

लवकरच समितीचे गठण
अंबरनाथमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटावी यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित विषयातील तज्‍ज्ञाची एक समिती गठीत करण्याचे ठरले आहे, शहरात पार्किंग, नो पार्किंग झोन, याविषयी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नगरपालिकेचे अधिकारी संदीप कांबळे यांनी दिली.

नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग, सम विषम तारखांना वाहने उभी करण्याबाबत सूचना फलक लावले गेले आहेत. त्यामुळे थोडा फरक पडला आहे, असेही अधिकारी कांबळे म्हणाले. नागरिक देखील पार्किंगबाबत केलेल्या सूचनांचे पालन करतानाचे चित्र दिसून येते.

नगरपालिकांशी पत्रव्यवहार
शहरात रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच रिक्षा स्टँडची जागा, आवश्यक ठिकाणी गतिरोधक असावे याबाबत अंबरनाथ आणि बदलापूर पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण उप शाखेतर्फे पोलिस निरीक्षक सुभाष आजगावकर यांनी दिली.

कारवाईविरोधात बदलापूरकरांचा सूर
बदलापूरमध्येही रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. वस्तू खरेदी, बँक अथवा वैद्यकीय कारणांसाठी दुचाकी आणली तर वाहने उभी करायची कुठे हा प्रश्न उभा रहातो. आरटीओकडून कारवाई झाल्यास वादाचा मुद्दा उपस्थित होतो. पार्किंगची सोय करा आणि मग दुचाकींवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


बदलापूरमध्ये वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा आणि पालिका प्रशासन यांच्यात चर्चा झाल्या. गर्दीच्या ठिकाणी एक दिशा मार्ग, सम आणि विषम तारखांना पार्किंगबाबत बोलणी सुरू आहेत, अशी माहिती पालिकेचे शहर अभियंता संजय कुंभार यांनी दिली.

समस्या सुटणार कधी
प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, त्याच ठिकाणी सॅटिस प्रकल्प आणि वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव आहे, आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण होतील, चार मजली वाहनतळामध्ये ४०० दुचाकी उभी रहाण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असेही कुंभार म्हणाले. अंबरनाथला स्टेशन परिसरात दुमजली वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर वाहनतळ बांधण्याच्या कामाला गती मिळणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

१३ लाखांचा दंड वसूल
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बेकायदा पार्किंग केलेल्या वाहन चालकांकडून वर्षात १ जानेवारी ते मार्च २०२३ पर्यंत २३८४ प्रकरणांमध्ये १३ लाख १९ हजार ६५९ रुपये दंड आकारण्यात आल्याचे वाहतूक उपविभाग अंबरनाथ शाखेतर्फे सांगण्यात आले.
-------------------------------------------------
-------------------------------------------
भिवंडीत बोजवारा
पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
भिवंडी हे औद्योगिक आणि रहिवासी असे मिश्र व्यवस्थापनाचे शहर असून महानगरपालिकेने शहरातील पार्किंगकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने बोजवारा उडाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक व वाहनचालक हैराण झाले आहेत.
भिवंडी महापालिका नवीन इमारतीच्या बांधकामांना पार्किंगच्या जागेसह परवानगी देते. मात्र अनेक इमारतीमध्ये विकसकांनी पार्किंगच्या जागेवर व्यावसायिक गाळे बांधल्याने त्या इमारतीमधील रहिवाशांनी आणि दुकानदारांची वाहने रस्त्यावर उभी ठेवली जातात. त्यामध्ये ग्राहकांच्या वाहनांची भर पडते. त्यामुळे रस्त्यांचे वेळोवेळी रुंदीकरण करून देखील शहरातील रस्ते वाहनांनीच व्यापले जात आहेत. तसेच मुख्य बाजारपेठेत व भाजीमार्केटमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी शिवाजी चौकात बांधलेल्या मॉलमध्ये सार्वजनिक पार्किंग साठी जागा ठेवली असून त्याचे मोठे वाजतगाजत उद्‌घाटन केले. मात्र, आरंभशूर महापालिकेने त्या जागेत सध्या वाहने पार्क करणे सुरू न केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर लावली जात आहेत. ही परिस्थिती शहरातील सर्व मुख्य सार्वजनिक रस्त्यांवर दिसून येते.

वाहनांचा वेढा
कहर म्हणजे एस.टी.स्थानक ते कल्याणरोड राजीव गांधी चौक या दरम्यान वाहनमालकांनी पदपथाला देखील पार्किंग स्पॉट बनविला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांचे देखील हाल होऊ लागले आहे. या मार्गादरम्यान सर्व सरकारी कार्यालये असून, त्या कार्यालयाच्या आवारात वाहने उभी करण्यासाठी मुबलक जागा नाहीत. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातून आलेली वाहने रस्त्यावर पार्क केली जातात. दरम्यान, महापालिकेचे मुख्य कार्यालय असून, त्याला देखील नेहमी वाहनांचा वेढा पडलेला असतो.
-------------------------------------
जागा दिसेल तिथे ठोक वाहनतळ
भिवंडी शहरातील रहिवासी क्षेत्रात यंत्रमाग कारखाने, सायझिंग डाईंग आणि विविध अधिकृत व अनधिकृत औद्योगिक व्यवसाय सुरू आहेत. त्यासाठी कच्च्या व पक्क्या मालाची ने-आण करण्याकरिता छोटी-मोठी वाहने लागतात. त्या वाहनांना उभे राहण्यासाठी वाहनतळ पालिकेने गेल्या चाळीस वर्षात बनविलेले नाहीत. त्यामुळे ही वाहने शहरातील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला मोकळी जागा पाहून तेथे वाहने पार्क केलेली आढळून येत आहेत. तर काही वाहनचालकांनी उड्डाणपुलाखाली आपली वाहने पार्क करण्याची सोय स्वतः करून घेतली आहे. त्याचप्रमाणे अस्ताव्यस्त वाढलेल्या या शहरात रिक्षांना उभे राहण्यासाठी थांबे बनविण्यास जागा न दिल्याने शहरातील रिक्षा सार्वजनिक रस्त्यावरच उभ्या करून रिक्षाचालक आपला व्यवसाय करीत आहे. शहरात दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढती असून यावर कोणाचाच अंकुश नाही. वाहनांसह हातगाड्यांनी देखील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले आहे. शहरात पार्किंग नसल्याने शहराची वाताहत झाली असून, याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी आणि समाजसेवी संस्थांचे दुर्लक्ष आहे.
------------------------------------
कोट
ट्रक टर्मिनसचीही गरज
शहरात रहिवासी आणि औद्योगिक क्षेत्र असल्याने महापालिकेने शहरातील वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे. शहरात छोटी वाहने पार्क करण्यासाठी पे अँड पार्क वाहतुकीच्या मार्गावर सुरू करणे अपेक्षित आहेत. त्याचबरोबर मोठ्या वाहनांसाठी ट्रक टर्मिनन्स सुरू करणेही जरुरीचे आहे. त्यामुळे वाहने पार्कचा प्रश्न काही अंशी कमी होईल.
-मनीष पाटील, पोलिस निरीक्षक, भिवंडी शहर वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com