पैशाच्या वादावरून चुलत भावानेच केला खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैशाच्या वादावरून चुलत भावानेच केला खून
पैशाच्या वादावरून चुलत भावानेच केला खून

पैशाच्या वादावरून चुलत भावानेच केला खून

sakal_logo
By

पाठलाग
प्रमोद जाधव, अलिबाग

पैशाच्या वादावरून चुलत भावानेच केला खून

पैशाच्या हव्यासापोटी कोण काय करेल याचा थांगपत्ता नाही. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून चुलत भावानेच भावाचा खून केल्याची घटना अलिबाग-रेवदंडा मार्गावरील पालव येथील स्मशानभूमीत घडली. अलिबाग पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्या चुलत भावानेच हत्या केल्याचे निष्पन्न झाले. बँकेत शिपाई म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून मृत व्यक्तीने आरोपीकडून पैसे घेतले होते. मात्र, ते पैसे वेळेवर परत केले नाही आणि नोकरीही दिली नसल्याचा राग धरून धारदार कोयत्याने भावाने भावालाच ठार केले. या गुन्ह्यातील दोघेही पोलिस कोठडीत आहेत.
नथुराम पवार (४०) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. अलिबाग येथील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्षांपासून सफाई कामगार म्हणून तो काम करत होता. अन्य ठिकाणीही तो साफसफाई आणि इतर कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली तरी नथुराम घरी आला नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीने ठिकठिकाणी शोध घेतला. तरीही तो सापडला नाही. अखेर १३ मार्चला अलिबाग पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दुसऱ्या दिवशी १४ मार्चला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास पालव येथील स्मशानभूमीजवळ एक मृतदेह असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता असलेल्या नथुरामचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचे गांभीर्य ओळखून अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवली. पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव, सहायक फौजदार अनिल सानप, हवालदार सदानंद झिराडकर, सुनील फड, शशिकांत सुतार, अनिकेत म्हात्रे, रूपेश निगडे यांची दोन पथके तयार केली. सीसी टीव्ही फुटेजसह नथुरामच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात पोलिसांनी सुरुवात केली. मारेकऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर पोलिसांना सुगावा लागला.
नथुरामचा चुलत भाऊ नीलेश पवार त्‍याच्यासोबत १३ मार्चला बाहेर गेल्याची माहिती बँकेकडून उपलब्ध झाली. यातून पोलिसांचा नीलेशबाबत संशय वाढत गेला. पोलिसांनी अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील सीसी टीव्ही कॅमेरे पाहिले. त्यामध्ये नथुराम, नीलेश आणि अन्य एक व्यक्ती असल्याचे दिसून आले. हत्येच्या घटनेनंतर नीलेश व त्याचा सहकारी गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस पथकाने या दोघांचा शोध सुरू केला. अखेर सोलापूर येथून दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. पोलिसी दणका मिळताच दोघांनी पैशांच्या देवाण-घेवाणीवरून हत्या केल्याचे कबूल केले.

घटनेची पार्श्वभूमी
आरोपी नीलेश पवार हा देखील अलिबाग व परिसरात साफसफाई, गवत काढणे अशा अनेक प्रकारचे काम करत होता. त्याचा सहकारी साहिल राठोड हा नीलेशचा चुलत मेहुणा आहे. युनियन बँकेत सफाई कामगार म्हणून नथुराम काम करत होता. या बँकेत शिपाई पदाची भरती आहे. त्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागणार असल्याचे सांगून नथुरामने नीलेशकडून एक लाख रुपये घेतले होते. आठ महिन्यांपासून पैसे घेऊनही नथुरामकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे तो वारंवार नथुरामकडे विचारणा करत होता; मात्र नीलेशला ना पैसे ना नोकरी मिळाली. नथुरामच्या वागण्यामुळे तो संतापला होता. अखेर १३ मार्चला सकाळी ११च्या सुमारास युनियन बँकेत नथुरामला भेटला. त्यानंतर दुपारी साफसफाई व गवत कापण्याचे काम आल्याचे सांगून नथुरामला घेऊन तो पालव येथे आला. तेथील स्मशानभूमीजवळ रागाच्या भरात त्याने नथुरामवर धारदार कोयत्याने वार केले. चेहऱ्यापासून अंगावर एकूण १९ वार झाल्याने नथुराम गंभीर जखमी झाला. अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.