दिघा स्थानक लवकरच सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघा स्थानक लवकरच सेवेत
दिघा स्थानक लवकरच सेवेत

दिघा स्थानक लवकरच सेवेत

sakal_logo
By

वाशी, ता. २७ (बातमीदार) : ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे काम फेब्रुवारीमध्ये पूर्ण करण्यात आले. या रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्‍घाटन होणार असल्याचे आश्‍वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. माजी खासदार संजीव नाईक यांनी दानवे यांची भेट घेतली त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.

दिघा रेल्वे स्थानकातील सर्व कामे पूर्ण झाली असून, हे स्थानक प्रवाशांसाठी लवकरात लवकर खुले करण्याची मागणी नाईक यांनी केली. त्यावर संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्‍घाटन करण्यात येईल, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाईक यांना दिली आहे. नाईक यांच्या मागणीनुसार नवीन दिघा स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. आमदार गणेश नाईक यांनी दिघा रेल्वे स्थानकाची २४ फेब्रुवारीला रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक यांच्या समवेत पाहणी करून कामाचा आढावा घेतला होता. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, दिघा येथील स्थानिक नगरसेवक नवीन गवते उपस्थित होते. त्‍या वेळी आमदार गणेश नाईक यांनी महत्त्वाच्या सूचना स्थानकाच्या कामासंदर्भात केल्या होत्या. या पाहणी दौऱ्यानंतर राज्यमंत्री दानवे यांच्यासह आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांची ३ मार्चला बैठक झाली. या बैठकीमध्ये दिघा स्थानकाचे उर्वरित काम तत्परतेने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्‍या अनुषंगाने संजीव नाईक यांनी दानवे यांची दिल्ली येथे १६ मार्चला भेट घेतली.
दिघा स्थानकातील जवळजवळ सर्व अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत खुले करण्याची मागणी नाईक यांनी केली. त्या वेळी दानवे यांनी यासंदर्भात लगेचच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यानंतर दानवे यांनी संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन ६ एप्रिलपर्यंत सुरू आहे. हे अधिवेशन संपतात दिघा रेल्वे स्थानकाचे उद्‍घाटन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या आश्‍वासनानंतर मध्य रेल्वे, ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पार्किंगसाठी गैरसोय मिटणार
दिघा स्थानकामधील पार्किंगची गैरसोय पाहता आमदार नाईक यांनी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाला पत्र दिले आहे. त्याचबरोबर विशेष निधीमधून दीड कोटी रुपयाचा निधी स्थानकासमोर स्कायवॉक बांधण्यासाठी वापरला जाणार आहे.

स्थानक निर्मितीला ९० कोटी खर्च
नवी मुंबईतून जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा हे आठवे स्थानक आहे. ठाणे स्थानकानंतरचे (वाशीच्या दिशेने) हे पहिले स्थानक आहे. या स्थानकाच्या निर्मितीसाठी अंदाजे ९० कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. भविष्यामध्ये दिघा स्थानकातून एलिव्हेटेड मार्गाच्या माध्यमातून कळवा आणि पुढे कल्याण रेल्वे जंक्शन अशी संलग्नता निर्माण होणार आहे.‌ त्याबाबतचे काम प्रगतीपथावर आहे. एमआरव्हीसी पहिल्यांदाच अशा प्रकारे एलिवेटेड मार्गाची निर्मिती करत आहे.