
दर्शन सोळंकीचा विद्यार्थ्याकडून छळ,धमकी!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) त्याची सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये एका विद्यार्थ्याने छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. दर्शन सोळंकीने फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती.
आयआयटी मुंबईतील बीटेक प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकीने १२ फेब्रुवारीला वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तपासादरम्यान एसआयटीला दर्शन सोळंकीच्या आत्महत्येमागे जातिवाचक टिपण्णी हे एक कारण असल्याचे आढळल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तसेच सोळंकीच्या खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली, ज्यामध्ये ‘अरमान या सर्वांसाठी कारणीभूत आहे’ असे लिहिले आहे. अरमान इक्बाल खत्री नावाच्या विद्यार्थ्याचे नाव सुसाईड नोटमध्ये असून, सोळंकीचा छळ आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांचे काही दिवसांमधील व्हॉट्सअॅप चॅट्सदेखील तपासले असल्याचे समजते.
आरोपांची चौकशी
दर्शन सोळंकीच्या कथित आत्महत्येचा एसआयटीने पुन्हा तपास सुरू केला आहे. एसआयटीने दर्शनचे पालक, आयआयटी संस्थेचे अधिकारी आणि घटनेचे साक्षीदार असलेल्या विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. दर्शनला जातीय भेदभावाचा सामना करावा लागल्याच्या विविध विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आरोपांचीही चौकशी एसआयटी करत आहे.