
डोंबिवलीत याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळा उत्साहात
डोंबिवली, ता. २८ (बातमीदार) : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा, ज्ञानेश्वर कार्यालय यांच्यातर्फे डोंबिवली भूषण व याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कुष्ठरोग्यांचे सर्वार्थाने पुनर्वसन करणारे पद्मश्री गजानन माने, डोंबिवली यांना ‘डोंबिवली भूषण’ आणि नाशिकचे स्मार्त चुडामणी पंडित शांताराम भानोसे यांना याज्ञवल्क्य पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सुरेश शेवडे यांनी याप्रसंगी आपली संस्कृती कशी जपून ठेवली पाहिजे, असे खुमासदार शैलीत सांगितले. गजानन माने यांनी एखाद्या कुष्ठरोग पीडित व्यक्तीच्या पाल्याचा भार दत्तक पद्धतीने आर्थिक मदत न करता कसा घेता येईल हे श्रोत्यांपुढे ठेवले. तसेच भानोसे शास्त्रींनी याज्ञवल्क्य संहिता सर्वार्थाने जीवनाभिमुख कशी आहे याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष सुधीर बर्डे, सरचिटणीस, यतीन पाठक, प्रदीप जोशी यांनी केले होते.