
शहापुरात राज्यस्तरीय कविसंमेलन
खर्डी, ता. २९ (बातमीदार) : स्वराज्य लेखणी मंच आणि माझी लेखणी साहित्य मंचतर्फे शहापूर तालुक्यातील वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे कवी संमेलन पार पडले. या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंभरपेक्षा जास्त कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवर, साहित्यिक, विद्यापीठातील साधक यांनी भक्तिगीते गात, फुगड्या खेळत, वाजत गाजत काढलेली ग्रंथदिंडी या संमेलनाचे आकर्षण ठरली.
उद्घाटन सोहळ्यानंतर काशिनाथ तिवरे, स्वागताध्यक्ष ह.भ.प. डॉ. कैलास महाराज निचिते, उद्घाटक कवी भगवान जाधव यांचे साहित्यिक विचार आणि संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण उपस्थितांसाठी साहित्यिक मेजवानी ठरली. या वेळी कवी गुलाबराजा फुलमाळी, कवयित्री सुनीता कपाळे, प्रीती वानखेडे यांना स्वराज्यरत्न तर कवयित्री स्वप्ना बेलदार, अमृता संखे यांना लेखणी सम्राज्ञी पुरस्काराने गौरविण्यात आले. कवी अन्वर मिर्झा, रमेश तारमळे, महेश धानके, गंगाराम ढमके, संजय गगे खरीडकर, कवयित्री डॉ. तरुलता धानके, कवी एकनाथ देसले या निमंत्रितांचे कवी संमेलन साहित्य रसिकांसाठी पर्वणीच ठरली. काशिनाथ तिवरे, स्वागताध्यक्ष ह.भ. प. डॉ. कैलास महाराज निचिते, उद्घाटक कवी भगवान जाधव आणि संमेलनाध्यक्ष चंद्रकांतदादा वानखेडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काव्य सादरीकरण करणाऱ्या कवींचा व स्पर्धा विजेत्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.