
मुद्रांक शुल्काचे विक्रमी उत्पन्न
भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेला शासनाकडून मोठाच दिलासा मिळाला आहे. आयुक्त दिलीप ढोले यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुद्रांक शुल्काच्या तफावतीची रक्कम महापालिकेला नुकतीच मिळाली आहे. मुद्रांक शुल्काच्या एक टक्क्यापोटी सुमारे पन्नास कोटी रुपये एवढी रक्कम महापालिकेला दर वर्षी राज्य सरकारकडून मिळत असते; मात्र या वर्षी तफावतीच्या रकमेसह तब्बल १३६ कोटी रुपये मिळाल्यामुळे महापालिकेला मोठाच दिलासा मिळाला आहे.
मिरा-भाईंदर शहरातील मालमत्ता खरेदी-विक्रीपोटी राज्य सरकारला जेवढे मुद्रांक शुल्क मिळते, त्याच्या एक टक्का एवढी रक्कम महापालिकेला राज्य सरकारकडून दर वर्षी दिली जाते. त्यानुसार महापालिकेला दर वर्षी सरकारकडून सुमारे पन्नास कोटी रुपयांच्या आसपास निधी येत असतो; पण शहरात मालमत्ता खरेदी-विक्रीचे जास्त व्यवहार झाले असून ही रक्कम कमी असल्याचे महापालिकेचे म्हणणे होते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची तफावतीची रक्कम मिळावी, यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आता यश आले असून राज्य सरकारने यसंदर्भातील आढावा घेऊन नुकतीच मुद्रांक शुल्क तफावतीची तब्बल ८८ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली असून त्याचे शासन आदेशही जारी झाले आहेत. त्यामुळे याआधी आलेली मुद्रांक शुल्काची रक्कम व तफावतीची रक्कम असे एकंदर १३६ कोटी रुपये महापालिकेला यावर्षी मिळाले आहेत.
....
तफावतीपोटी ८८ कोटी मिळाल्याने दिलासा
मिरा-भाईंदर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. उत्पन्नवाढीचे आव्हान प्रशासनसमोर आहे. त्यातच पंधराव्या वित्त आयोगाकडून निधी हवा असेल, तर उत्पन्नात पंचवीस टक्के वाढ करण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. दुसरीकडे शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी महापालिकेने बँकेकडून पाचशे कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतले आहे. या कराची परतफेड करण्यासाठीदेखील उत्पन्नात वाढ होणे अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे यंदा मालमत्ता करासह अन्य उत्पन्न जास्तीत जास्त मिळवण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. या परिस्थितीत महापालिकेला मुद्रांक शुल्काच्या तफावतीपोटी अतिरिक्त ८८ कोटी रुपये मिळाल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे.