दोघा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोघा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गुन्हा
दोघा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गुन्हा

दोघा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा गुन्हा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : पामबीच मार्गावर वर्षभरापूर्वी हिट ॲण्ड रन प्रकरणात पोलिस शिपाई हनुमंत डवरे हे गंभीर जखमी झाले होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नीने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर खडबडून जागे झालेल्या सीबीडी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत अपोलो हॉस्पिटलमधील डॉ. प्रशांत अग्रवाल आणि एकायन हॉस्पिटलमधील डॉ. राहुल वंजारी यांच्याविरोधात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सीवूड्स वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई हनुमंत डवरे हे १२ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री पामबीच मार्गावरील टी. एस. चाणक्य चौकात नाकाबंदीवर कार्यरत होते. मध्यरात्रीच्या सुमारास प्रणय ऑबेराय याने बॅरीकेट्स, तसेच डवरे यांना कारने जोरदार धडक देऊन पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत डवरे यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डावा हात आणि पायाची शस्त्रक्रिया केल्यानंतर डवरे यांना वेदना होत असतानाही रुग्णालयाकडून तीन दिवसांतच डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने मार्च २०२२ मध्ये उलवे येथील एकायन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. अपोलोमध्ये चुकीच्या पद्धतीने प्लेट्स लावल्याचे सांगत डॉ. राहुल वंजारी यांनी पुन्हा शस्त्रक्रिया करत नवीन प्लेट्स टाकल्या होत्या. यासाठी पाच लाखांचा खर्च झाला होता, तर दुसरीकडे अपोलो हॉस्पिटलकडून बिल भरण्यासाठी डवरे यांना सतत संपर्क साधण्यात येत होता.

डवरे यांच्या पत्नी संगीता यांनी अपोलो हॉस्पिटलविरोधात कारवाई व्हावी, यासाठी सीबीडी पोलिस ठाण्यात ऑगस्ट २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाई करण्यात न आल्याने त्यांनी राज्य अधिवेशनाच्या वेळी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणंद, सातारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानंतर कारवाई
सीबीडी पोलिसांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील जिल्हा शल्य चिकित्सकांकडून या प्रकरणाची पडताळणी केली. अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. प्रशांत अग्रवाल, एकायन हॉस्पिटलच्या डॉ. राहुल वंजारी यांनी उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.