
२५ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुबई, ता. ८ : पश्चिम रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १७० कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे. यामध्ये ४३.०७ कोटी रुपये दंड एकट्या मुंबई उपनगरी विभागातून वसूल करण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेवर एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २५.६३ लाख प्रकरणे आढळून आली. यामधून १७०.३५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वसुली ५० टक्क्यांनी वाढल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात गेल्या आर्थिक वर्षात ४३.०७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर एकट्या मार्चमध्ये ३.८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल २०२२ पासून आतापर्यंत ४८ हजार ६९१ हून अधिक अनधिकृतरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.