भिमनगर येथील पवार चाळ धोक्यात

भिमनगर येथील पवार चाळ धोक्यात

घाटकोपर, ता. १० (बातमीदार) ः मुंबईत पावसाळ्यात मातीचे भूस्खलन होण्याचे प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांत वाढले आहेत. उपनगरांत चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, कुर्ला आणि भांडुप परिसरात टेकडीवरील माती खचून घरे कोसळली आहेत. घाटकोपर पश्चिम हा डोंगराळ परिसर असून येथील अनेक घरे ही टेकडीवर वसलेली आहेत. भीमनगर आणि व्ही. एम. पवार चाळीतील घरे ही डोंगर भागात येत असून या भागात भूस्‍खलन होऊन पवार चाळ कोसळण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.
सर्वोदय मंदिराच्या मागील टेकडीवर व्ही. एम. पवार चाळीत दीडशेच्या आसपास घरे असून यातील १५ ते २० घरे ही अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या टेकडीवरील माती व दरड कधीही खाली कोसळून येथे दुर्घटना घडू शकते, अशी भीती या चाळीतील रहिवाशी व्यक्त करत आहेत. या चाळीच्या काही भागासाठी अर्धवट संरक्षण भिंत बांधली असून अर्धवट राहिलेल्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आमदारांना निवेदन दिले आहे. तसेच वारंवार पालिकेकडे देखील आम्ही निवेदन देत आहोत, असे स्थानिक रहिवासी विनोद जाधव यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यापूर्वी ही भिंत उभारण्याची मागणी केली आहे. दरम्‍यान, सामाजिक कार्यकर्ते सोनू पवार यांनी अर्धवट राहिलेल्‍या संरक्षक भिंतीचे काम लवकरात लवकर पूर्ण केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे सांगितले आहे.

मेट्रो आणि लिंक रोडसाठी कारवाई
पश्चिमेतील व्ही. एम. पवार चाळीमध्ये १९३५ पासून १५० रहिवासी येथे राहत आहेत. मेट्रो आणि घाटकोपर अंधेरी लिंक मार्गात भीमनगर आणि या चाळीचा अर्धा परिसर तोडण्यात आला. पवार चाळीतील पंधरा ते वीस घरे ही सध्या धोक्यात आली असून येथील टेकडीवरील माती कधीही खाली कोसळू शकते, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात आमदार राम कदम यांना लेखी निवेदन देऊन संरक्षण भिंतीची मागणी केली आहे.

पवार चाळीतील १५ ते २० घरे सध्या धोक्याच्या सावटाखाली आहेत. कधीही टेकडीवरील माती कोसळून घरे पडू शकतात. पावसाळ्यात येथे जीवितहानी घडण्याआधी पालिकेने आम्हाला संरक्षक भिंत बांधून द्यावी.
- विनोद जाधव, रहिवासी

भीमनगर व पवार चाळीस लागून सुरू असलेल्या खोदकामामुळे पवार चाळीतील घरे ढासळण्याच्या परिस्थितीत आहेत. येत्या पावसाळ्यात माळीणप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळीच कारवाई करावी.
- ॲड. अभिषेक सावंत, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com