केडीएमसीमधील फाईल्सची हेराफेरी ?

केडीएमसीमधील फाईल्सची हेराफेरी ?

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम विभागातून पाच फाईल्स गहाळ झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पालिका प्रशासनाने एका शिपायाला निलंबित केले आहे. बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांच्या नकळत हे प्रस्ताव तयार केले असल्याने आयुक्तांनी हे प्रस्ताव रोखले होते. याप्रकरणी पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याच प्रस्तावाच्या फाईल्स गहाळ झाल्याची घटना घडल्याने पालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. केडीएमसीमध्ये फाईल्सची हेराफेरी होते का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सुस्थितीत असलेले डांबरीकरणाचे रस्ते, काँक्रिटीकरण करण्याचे प्रस्ताव बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. शहर अभियंता विभागाकडून हा प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या दालनात अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला. या प्रस्तावाविषयी आयुक्तांना संशय आल्याने त्यांनी हे प्रस्ताव तयार करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाच अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले. या कार्यवाहीसाठी आयुक्तांच्या दालनातून रस्ते कामाच्या फाईल या सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या दालनात पाठविण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात पालिका प्रशासनाने शिपायाला निलंबित केले असले तरी या फाईल्स दालनाच्या बाहेर गेल्या कशा, यामध्ये अधिकाऱ्यांची गडबड झाली की आणखी काही काळे बेरे यामागे होते. पालिका आयुक्तांच्या नकळत कामाचे प्रस्ताव तयार होतात कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.
.....
आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यवाही
आयुक्तांच्या आदेशानुसार अभियंत्यांना करचे यांनी कारणे दाखवा नोटिशीची प्रक्रिया करत फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविणे आवश्यक असताना त्या फाईल्स वरिष्ठांकडे गेल्या नाहीत. आयुक्तांनी संबंधित विभागाला विचारणा केल्यानंतर त्या पाच फाईल्स गायब झाल्याची बाब उघड झाली. फाईल सापडत नसल्याने त्या हाताळणाऱ्या शिपायाकडे विचारणा करण्यात आली. त्याला याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले असता फाईल हाताळणाऱ्या शिपायाला आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com