ठाण्यात टीएमटी-एसटी वाहक भिडले

ठाण्यात टीएमटी-एसटी वाहक भिडले

ठाणे, ता. १० (वार्ताहर) : ठाणे स्थानकाजवळील सॅटिस येथे प्रवासी घेण्याच्या वादातून ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचे (टीएमटी) वाहक आणि राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) वाहक भिडल्याचा प्रकार सोमवारी (ता. १०) घडला. या वेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार शिवीगाळ केली. अखेर इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.

ठाण्याच्या विविध भागात जाणाऱ्या टीएमटी बस आणि ठाणे एसटी आगारातून निघालेल्या महामंडळाच्या बस सॅटीसवरून निर्धारित स्थळी जातात; मात्र सॅटीसवर असलेल्या टीएमटी चौकीजवळ अरुंद रस्त्यावर टीएमटी उभ्या केल्याने एसटी बसना जागा मिळत नाही. त्यामुळे एसटी थांबताच टीएमटीचे प्रवासी एसटीकडे वळतात. याचमुळे सोमवारी टीएमटी आणि एसटी वाहकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

सॅटिस येथून ठाणे ते बोरिवली ही एसटी बस वाहक डी. बी. डीघे आणि के. व्ही. पाटील नेत होते. या वेळी टीएमटी डेपोजवळ उभ्या असलेल्या अन्य एका बसमुळे या बसला थांबावे लागले. त्याचवेळी घोडबंदरकडे निघालेले टीएमटीचे प्रवासी एसटी बसमध्ये चढले. टीएमटी वाहकांनी हट्ट धरीत एसटीमध्ये चढलेल्या प्रवाशांना उतरवा, अशी मागणी केली; तर एसटी वाहक डीघे यांनी मात्र प्रवाशांना तुम्हीच उतरावा, अशी भूमिका घेतली. अखेर इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती हा वाद मिटवला.

टीएमटी कर्मचाऱ्यांची दबंगगिरी
ठाणे एसटी आगारातून घोडबंदर रोडकडे जाण्यासाठी सॅटीसशिवाय दुसरा मार्ग नाही. एसटी आगारातून बस बाहेर पडताच सॅटीसच्या चढणीवर बाजूला टीएमटी चौकी आहे. या ठिकाणी टीएमटी वाहक नोंदीसाठी बस उभ्या करतात. त्यामुळे एसटीला रस्ता मिळण्यासाठी वाट बघावी लागते. सॅटीसवर टीएमटी वाहक आणि चालक हे दबंगगिरी करीत असल्याचा आरोप एसटी वाहक डी. बी. डीघे आणि चालक के. व्ही. पाटील यांनी केला आहे.

सॅटीस अपुऱ्या आणि वळणाच्या जागेवर असल्याने समस्या निर्माण होते. त्यावर उपाय योजनेचा विचार होईल. शिवाय एसटी किंवा टीएमटी दोन्ही परिवहन सेवा आहेत. टीएमटीचे वाहक आपला धंदा गेला म्हणून व्यथित होते. शेवटी दोन्ही कर्मचारी यांना आपली रोजीरोटी अबाधित राहावी असे वाटते. म्हणून सामंजस्याने प्रश्न सोडवावे. लवकरच उपाययोजना आवश्यक आहेत.
- विलास जोशी, परिवहन समिती सभापती, ठाणे पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com