
‘गंगा भगीरथी’चा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी
मुंबई, ता. १४ : राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळावा म्हणून त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं.भा.) असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. या प्रस्तावाला समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला असून, तो अमलात आणू नये अशी मागणी आमदार रईस शेख यांनी प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.
गंगा भगीरथी संबोधन फार पूर्वी विधवा महिलांसाठी वापरले जायचे. स्रियांमध्ये समानता आणण्यासाठी महिला संघटनांनी लढा दिल्यानंतर आज सर्वच महिलांना ‘श्रीमती’ हे संबोधन वापरले जाते. ते आता प्रचलितदेखील झाले आहे. असे असताना राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने स्रीच्या आयुष्यात पती असण्या-नसण्यावरून भेद करावयाचे ठरवले आहे. विधवा महिलेला ‘गंगा भगीरथी’ शब्द रुढ करण्याचा घाट हा बुरसटलेल्या पुरूषी मानसिकतेचा आहे, असा आक्षेप रईस शेख यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या पत्रातून घेतला आहे. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.