धनश्री कंक हिला ‘ईला’ पुरस्कार

धनश्री कंक हिला ‘ईला’ पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः खो-खो फेडरेशनतर्फे दिला जाणारा ‘ईला’ हा राष्ट्रीय पुरस्कार कोपरखैरणे येथील धनश्री कंक हिला देण्यात आला आहे. हा पुरस्कार १४ वर्षांखालील खेळाडूंना दिला जातो. माथाडी कामगाराची मुलगी असणारी धनश्री हिने हा पुरस्कार पटकावल्याने परिसरात तिचे कौतुक होत आहे.

धनश्री कंक ही कोपरखैरणेतील ज्ञान विकास विद्यालयात सातवीत शिकते. गेल्या तीन वर्षांपासून ती खो-खो खेळत आहे. धनश्रीने ठाणे जिल्हा संघाची कर्णधार म्हणून कामगिरी बजाली आहे. आतापर्यंत तीन राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तसेच तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्येही प्रतिनिधित्व करून तिने सुवर्णपदकाची कमाई केली. या वेळी महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून तिने जबाबदारी पार पाडली. १४ वर्षांखालील खो-खो संघात धनश्री संरक्षक म्हणून ओळखली जाते. आता राष्ट्रीय पातळीवरील ‘ईला’ या पुरस्काराने गौरवण्यात आल्याने तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. धनश्रीसारख्या होतकरू खेळाडूंना समाजातील आणखी दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास धनश्री एक दिवस देशासाठी ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकेल, असा आत्मविश्वास तिचे प्रशिक्षक विनायक मनसुख यांनी व्यक्त केला.

धनश्रीचे वडील प्रकाश कंक हे माथाडी कामगार आहेत. शेजारच्या एपीएमसी मार्केटमध्ये ते भाजीपाल्याच्या गोणी वाहण्याचे काम करतात. हातावर मिळणाऱ्या तुटपुंज्या पागारावर ते कुटुंबाचा खर्च भागवतात. कोपरखैरणेतील ज्ञान विकास विद्यालयात धनश्री सातवी वर्गात शिकते. धनश्रीला चार बहिणी आणि एक भाऊ आहे. धनश्रीला लहानपणापासूनच मैदानी खेळांची आवड होती; घरातील परिस्थितीमुळे तिला मैदानावरील खेळ खेळणे परवडणारे होते, परंतु शाळेतील शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे धनश्रीमध्ये खेळाडू तयार होत होता. तीन वर्षांपूर्वी धनश्रीच्या खो-खो खेळाच्या सरावाला सुरुवात झाली. शिक्षकांच्या आणि प्रशिक्षक विनायक मनसुख यांच्या पाठिंब्यामुळे धनश्री खेळात रमू लागली. दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असा तीन वेळा सराव करू लागली. धनश्रीच्या या कामगिरीमुळे आता तिच्या घरातील नातेवाईकांचा विरोध मावळला आहे. धनश्रीची मोठी बहीण कल्याणी हीदेखील खो-खो खेळातील राष्ट्रीय खेळाडू आहे. दोन वेळा तिनेसुद्धा सुवर्णपदक कमावले आहे. यापुढे जानकी पुरस्कार, महिलांच्या खुल्या गटात राणी लक्ष्मीबाई पुरस्कार; तर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्कार अशा तीन पुरस्कारांवर नाव कोरण्याची इच्छा असल्याचे धनश्री सांगते. त्यादृष्टीने तिचा रोज सरावही सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com