रस्त्यासाठी घारीवलीकर उतरले रस्त्यावर

रस्त्यासाठी घारीवलीकर उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : कल्याण-शिळ महामार्गावरील घारीवली गावाजवळील छेदरस्ता हा वाहतूक विभागाच्या वतीने बंद करण्यात आला आहे. हा छेद रस्ता सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. २१) घारीवली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. या वेळी प्रशासनाविरोधात गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली. वाहतूक पोलिसांनी यावर चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कल्याण, डोंबिवलीसह उपनगरातील नागरिकांना ठाणे, नवी मुंबई, मुंबई दिशेला प्रवास करण्यासाठी कल्याण-शीळ मार्ग हा रस्ते वाहतूक पर्याय महत्त्वाचा आहे. या मार्गावर सकाळ, संध्याकाळी वाहनांची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्याच्या घडीला मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत असून या रस्त्यावरील कोंडी फोडण्यात वाहतूक विभाग अपयशी होत आहे. वाहन कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने गावातून येणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या समोरील महामार्गावरील छेदरस्ते सिमेंटचे बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर अनेक गावांचे छेदरस्ते सुरू करण्यात आले आहेत. तसेच बड्या गृहसंकुलांसमोरील छेदरस्ते हे बंदच करण्यात आलेले नाहीत. घारीवली गावचा छेद रस्ता का बंद ठेवण्यात आला आहे, असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. घारीवली गावकऱ्यांसाठी छेदरस्ता खुला करण्यात यावा, या मागणीकडे वाहतूक विभाग व एमएसआरडीसी यांचे लक्ष वेधण्यासाठी गावकरी रस्त्यावर उतरले, असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले. या वेळी मधुकर माळी, हरीश पाटील, गजानन पाटील यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com