अक्षय बागायतीसाठी कृषी संशोधन केंद्र विकासाच्या दिशेने

अक्षय बागायतीसाठी कृषी संशोधन केंद्र विकासाच्या दिशेने

प्रसाद जोशी, वसई
पालघर जिल्ह्यात शेतीमध्ये संशोधन, विस्तार आणि प्रशिक्षण कार्य करणे ही उद्दिष्टे ठेऊन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधक केंद्र पालघरची स्थापना झाली. या केंद्राच्या माध्यमातून आजतागायत विविध प्रयोग, संशोधन करून शेतमालाचे उत्पादन अधिकाधिक कसे होईल, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
शेतकरी काबाडकष्ट करून हिरवा मळा फुलवतो. मात्र शेती करताना या अन्नदात्याला अनेक संकटांवर मात करावी लागते. शेतीतून उत्पादन अधिक मिळावे, उत्पन्न व त्यातून जीवनमान उंचावण्यासाठी पालघर जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्रदेखील विकसित शेतीसाठी प्रयत्न करत आहे. यात बागायत शेती रक्षणासाठी विविध प्रयोग करत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.
संशोधन केंद्रावर पाच वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत. या योजनांमध्ये विविध पिकांवर संशोधन करण्यात येत असून निकषाच्या आधारे तंत्रज्ञानाची शिफारस करण्यात येते. संशोधनातून सुधारित जाती विकसीत करणे, लागवड पद्धत, खत आणि पाणी व्यवस्थापन, किड व रोग यांच्या नियंत्रणाचा समावेश होतो. त्यामध्ये या केंद्राच्या माध्यमातून भात पिकात पालघर १, पालघर - २, तर गवतामध्ये मोशी - ९३, मारवेल - ४०, मावेल ९३ आणि बेर २७६ या जाती विकसित केल्या आहेत. तसेच जांभूळ पिकाची कोकण बहाडोली, टोमॅटो पिकाची कोकण विजय, वांगीची कोकण प्रभा या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. मागील १० वर्षांत या केंद्रावरून शेतकऱ्यांसाठी २१ संशोधन शिफारशी देण्यात आल्या आहेत. २०२२-२३ वर्षात डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये ५० वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठक देखील पार पडली. या बैठकीमध्ये कृषी संशोधन केंद्र, पालघर केंद्रावरून ३ शिफारशी देण्यात आल्या. चिकू या पिकांपासून अधिक उत्पादन मिळावे म्हणून पालवी अवस्था, फळधारणा, फळाची वाटाणा अवस्था, फळवाढीची अवस्था अशी वर्गवारी करून खतमात्रा कोणत्या प्रमाणात असावी, या बाबींचा समावेश शिफारशीत आहे.
कृषी संशोधन केंद्राने विविध भाजीपाला, फळांची लागवड केंद्रात केली आहे. यासाठी भाजीपाला, फळांवर कोणते परिणाम होतात याचा अभ्यास करून, नवनवीन प्रयोग हाती घेतले जातात. यामध्ये भाजीपाला कलमीकरण, खतांचे नियोजन, लागवडीचे अंतर आणि जाती तपासणे यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढेल व याचा अधिकाधिक फायदा पालघर जिल्ह्यातील शेतकरी राजाला मिळावा, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
--------------------
विविध पिकांचे बीजोत्पादन
कृषी संशोधन केंद्रावर विविध भात, भाजीपाला पिके, कडधान्ये, तेलबिया आणि गळित धान्याचे बीजोत्पादन घेतले जाते. तसेच विविध फळपिकांची, मसाला पिके व भाजीपाला पिकांची कलमे रोपे तयार केली जातात, तर कार्यक्रमामध्ये प्रशिक्षण वर्ग, प्रदर्शन, स्थळभेटी, सर्वेक्षण चर्चासत्र यामधून केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जाते.
------------------
संशोधनात्मक शिफाशी
प्रथिनयुक्त चाऱ्याचे उत्पादन व आर्थिक नफा मिळावा म्हणून बरसीम या आंतरपिकाची २.१ या प्रमाणात लागवड करण्याची शिफारस शेतकऱ्यांना करण्यात आली आहे
रब्बी हंगामात जास्त उत्पादन व आर्थिक नफा मिळविण्यासाठी गोलाकार वांगी असलेली बी. बी. ५४ या वाणाची लागवड करावी चिकू पिकात खताच्या मात्रेचे प्रमाणदेखील कृषी विद्यापीठाने निश्चित करून शिफारस केली आहे.
---------------------
खताची मात्रा
वाढीची अवस्था - नत्र - स्फुरद - पलाश
पालवी अवस्था - २० - ४० - ३२
फळधारणा अवस्था - २० - ० - १६
फळांची प्राथमिक अवस्था - २० - ४० - १६
फळवाढीची अवस्था - २० - ० - १६
----------------
२० टक्के शिफारस केलेली मात्रा
१५ किलो गांडूळ खताबरोबर १०० ग्रॅम अझाटोबँक्टर आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी १०० ग्रॅम वणारे जिवाणू प्रतिझाड.
-------------------
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे विकसित केलेले बी - बियाणे, कलमे रोपे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबतच्या शिफारसी पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करून आर्थिक उन्नती करावी.
- डॉ. विजय सागवेकर, प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, पालघर
-------------------
वसई : कृषी संशोधन केंद्र, पालघरने विविध पिकांचे केलेले प्रयोग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com