रमजान ईद बातम्या

रमजान ईद बातम्या

रोह्यात रमजान ईद उत्साहात साजरी
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा
रोहा, ता. २२ (बातमीदार) : इस्लाम धर्मात पवित्र समजली जाणारी रमजान ईद मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना आलिंग देत ईदीच्या शुभेच्छा दिल्या.
रोहा शहरातील खालचा मोहल्ला जामे मस्जिद, वरचा मोहल्ला मस्जिद, मिल्लत नगर येथील सफा मर्वाहा मस्जिद, सलमान फारसी, अष्टमी येथील जामे मस्जिद; तसेच चणेरा ग्रामीण भागातील न्हावे, कोकबन, सूडकोली, खैरे खुर्द, चांडगाव, कोलाड व नागोठणे विभागात सकाळी ७ ते ८:३० च्या दरम्यान प्रत्येक मशीदीत खतीब (मौलाना) यांनी रमजानचा खुतबा पठण आणि नमाज अदा करून सर्वत्र शांतता, एकोपा व भाईचारा नांदावी अशी प्रार्थना केली. प्रत्येक जमातीचे अध्यक्ष व सचिवांनी तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक मशीदीसमोर चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते. ईदची नमाज अदा केल्यानंतर पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. खासदार सुनील तटकरे, आमदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार अवधूत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष ॲड. मनोजकुमार शिंदे, शहरप्रमुख मंगेश रावकर, काँग्रेस नेते समीर सकपाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, शहराध्यक्ष मितेश कल्याणी, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र गुजर, महेश कोलटकर, राजू जैन, अजित मोरे, नवनीत डोळकर आदी सर्वपक्षीय नेत्यांनी मुस्लिम समाज बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रोहा : अष्टमी येथे मुस्लिम समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देताना पोलिस अधिकारी व कर्मचारी.

अक्षय्‍य तृतीया, रमजान ईदचा उत्साह
माणगाव (बातमीदार) : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पवित्र मुहूर्त अक्षय्य तृतीया आणि मुस्लिम धर्मातील पवित्र ईद-ऊल-फित्र म्हणजेच रमजान ईद शनिवारी (ता. २२) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवारी (ता. २१) चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी रमजानची ईद साजरी करण्यात आली. ईदनिमित्त सामुदायिक नमाज शनिवारी नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील जामा मशिदीत सकाळी ८ वाजता झाली, अशी माहिती येथील मस्जिद मोहल्ल्याचे अध्यक्ष सरफराज अफवारे यांनी दिली.

सातवर्षीय मदिहाचे रोजे पूर्ण
माणगाव (बातमीदार) : जुने माणगाव येथील मुदस्सीर अशरफ शेख यांची कन्या मदिहा मुदस्सीर शेख हिने वयाच्या सातव्या वर्षी अत्यंत कोवळ्या वयात पवित्र रमजानचे सर्व रोजे (उपवास) यशस्वी पूर्ण केल्याने तिचे माणगाव तालुक्यातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे. इस्लाम धर्मात ईमान, नमाज, रोजा, जकात, हज हि पाच मूलभूत तत्त्वे मानली जातात. त्यापैकी रमजान महिन्यातील रोजा हा एक आहे. इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिना सुरू होतो. यावर्षी मार्च व एप्रिल महिन्याच्या कडक उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. या परिस्थितीत मदिहाने अत्यंत कोवळ्या वयात रमजानचे सर्व रोजे यशस्वीरीत्या पूर्ण करून ती पहिल्या रमजानची मानकरी ठरल्याने तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com