जांभूळ संवर्धनासाठी मधमाशी भिरभिरणार

जांभूळ संवर्धनासाठी मधमाशी भिरभिरणार

मोहिनी जाधव ः बदलापूर
मुंबईतील क्रॉफर्ड ते दादर फळ बाजारपासून अगदी ठाणे जिल्हा, वसई, पुणे येथील बाजारपेठेत विक्रीसाठी व चवीसाठी अव्वल ठरणाऱ्या बदलापुरातील जांभूळ संवर्धनासाठी आता खादी ग्रामोद्योग मंडळ उत्सुक आहे. यासाठी मंडळाने बदलापुरात नव्याने मधुबन तयार करण्याचा मानस व्यक्त केला असून त्यासंदर्भातील पत्र मंडळाने बदलापुरात जांभूळ व पर्यावरण संवर्धन करणाऱ्या बदलापूर जांभूळ ट्रस्टच्या नावे पाठवले आहे. लवकरच यासंदर्भात पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांतील जांभूळपेक्षा बदलापुरात पिकणारा जांभूळ हा त्याच्या मूळ प्राकृतिक अशा गडद जांभळ्या रंगाचे आणि अँथोसायनिनचे प्रमाण अधिक असून, यात उत्तम प्रकारचे अँटी ऑक्सिडंट असते. येथील जांभळाला भौगोलिक नामांकन मिळावे यासाठी बदलापूर जांभूळ ट्रस्ट अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. त्यातच बदलापूरमध्ये झपाट्याने होत असलेले नागरीकरण, बदलापूरच्या जांभूळला मोठ्या प्रमाणात होत असलेली मागणी व जांभूळ वृक्षांचा होत असलेला ऱ्हास लक्षात घेता बदलापूर जांभूळ ट्रस्ट त्यांच्यासह निसर्गप्रेमी मंडळ हे जांभूळ वृक्ष संवर्धनसाठी विशेष प्रयत्न करत आहेत. यासाठी ग्रामीण व उपलब्ध जंगल परिसरात जांभूळ बिजरोपण करून जांभळाची अनेक झाडे उभारणीसाठी काम केले जात आहे. यातच या सगळ्या मोहिमेची दखल महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांनी घेतली आहे. त्यानुसार जांभळाचे योग्य संवर्धन व्हावे, शेतकऱ्यांना पर्यायी व्यवसाय मिळावा याकरिता जांभळाची झाडे असलेल्या वन प्रदेशात या शेतकऱ्यांना मधमाशीच्या पेट्या देण्यात येणार आहेत. यामुळे जांभळाच्या झाडांचे संवर्धन होईल, तसेच या परिसरातील मध गोळा करून मिळालेला मध हा उच्च प्रतीचा असेल, त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागणार आहे. या अनुषंगाने खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील असून, लवकरच यासंदर्भात पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.
यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यासाठी २१ लाखांचा निधी आणि जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या बदलापूर आणि आसपासच्या भागात जवळपास दीड हजाराच्या घरात जांभूळ वृक्ष आहेत; मात्र जांभळाला वाढती मागणी व त्यांची उपलब्धता वाढावी यासाठी बदलापूर जांभूळ ट्रस्ट हे विविध माध्यमांतून प्रयत्न करत आहेत.

.....
१५ दिवसांचे प्रशिक्षण
जांभूळ संवर्धनासहित मधुबन संकल्पनेतून या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा लाभ होईल तसेच मध पेटी हाताळताना मधमाशीचा चावा होऊ नये, यासाठी दहा ते पंधरा दिवस प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. यामध्ये पेटीतून मध व मेण वेगळे कसे करायचे व यातून जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळवायचे याचेदेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
.....
मधुबनच्या माध्यमातून बदलापुरातील शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांचे शिबिर आयोजित करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच यातून तयार होणारा मध व मेण यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ शेतकऱ्यांना हमीभाव देणार आहे. या माध्यमातून महत्त्वाचा हेतू म्हणजे जांभूळ संवर्धन हे होणार आहे. तसेच फक्त भौगोलिक मानांकन मिळून ते बिरुद मिरवण्यापेक्षा त्याचा लाभ हा प्रत्यक्ष शेतकरी, आदिवासी बांधव यांना मिळावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील होतो आणि याची दखल आता महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने घेतली असून, लवकरच यासंदर्भात पुढील बैठक व प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात येईल.
- आदित्य गोळे, बदलापूर जांभूळ ट्रस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com