सेतू सहकाराचा सदर

सेतू सहकाराचा सदर

सेतू सहकाराचा सदर

शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

घरे भाड्याने देणाऱ्यांकडून संस्था
वेगळी रक्कम मागू शकते का?

प्रश्न ः मी एका सहकारी गृहनिर्माण संस्थेची सभासद आहे. मी माझी वन-रूम किचनची सदनिका भाड्याने देते. त्यासाठी संस्था बिनभोगवटा शुल्काव्यतिरिक्त, प्रत्येक ११ महिन्यांच्या मुदतीसाठी पाच हजार रुपये ‘सोशल वेल्फेअर फंड’च्या नावाखाली घेते. ही रक्कम पूर्वी तीन हजार रुपये होती. सहकार कायद्यानुसार सदनिका भाडेतत्त्वावर देण्यासाठी अशा दोन्ही रकमा देणे आवश्यक व कायदेशीर आहे का? केवळ सदनिका भाड्याने दिलेल्या सभासदांकडूनच अशा पद्धतीने सोशल वेल्फेअर फंड घेणे उचित आहे का? हे पैसे संस्थेकडून परत घेता येतील का?
- स्वाती देवधर सिंह, अंधेरी, मुंबई
उत्तर ः सहकार कायद्यामधील तरतुदींच्या आधारे राज्य शासन वेळोवेळी सहकारी संस्था सभासदांच्या हक्कांच्या रक्षणाच्या दृष्टीने वेगवेगळी परिपत्रके जारी करत असते. त्याच अधिकाराचा वापर करून बिनभोगवटा शुल्क (नॉन ऑक्युपन्सी चार्जेस) किती घ्यावे, याबाबत परिपत्रकानुसार सर्व सहकारी संस्थांना मार्गदर्शन आणि सूचना करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकाला कायद्याचा दर्जा प्राप्त होतो व सहकारी संस्थांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. या परिपत्रकाचे पालन संस्था करते किंवा नाही, हे पाहण्याचे काम संस्थेचे लेखापाल, जे कायदा कलम ८१ नुसार संस्थेचे लेखापरीक्षण करतात, त्याने करणे आवश्यक आहे. तुमच्या संस्थेत असलेल्या लेखापरीक्षकाचे अहवाल आपण पाहावे व त्यामध्ये या बाबीचा उल्लेख आहे किंवा नाही, याची खातरजमा करावी. नसल्यास त्या विषयीचा प्रश्न आपण प्रथम लेखापरीक्षकाला विचारणे आवश्यक आहे. तसेच ही रक्कम घेण्याचा ठराव जेव्हा सर्वसाधारण सभेमध्ये संमत झाला त्या वेळी आपली भूमिका काय होती, हेही तपासावे. या परिस्थितीत संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार सोशल वेल्फेअर फंड सभासदांकडून मागण्याची व घेण्याची तरतूद आहे. मात्र जे सभासद त्यांची सदनिका भाडेतत्त्वावर देतात त्यांच्याकडूनच फक्त या तरतुदीनुसार मागणी करणे केव्हाही अयोग्य आहे. सोशल वेल्फेअर फंड वसूल करण्याचा आणि सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचा कोणताही संबंध लावणे हे अयोग्य व कायद्याला मान्य नाही. संस्था बिनभोगवटा शुल्क म्हणून बिलाच्या दहा टक्के रक्कम घेऊ शकते. आताच्या नव्या नियमानुसार त्या दहा टक्के रकमेवर जीएसटीसुद्धा लागू शकतो; परंतु अकरा महिन्यांकरता सदनिका भाड्याने देण्यासाठी पाच हजार रुपये सोशल वेल्फेअर फंड म्हणून अधिक बिनभोगवटा शुल्क मागणे, हे केव्हाही अयोग्य व बेकायदा आहे. अशा प्रकारे संस्थेने घेतलेली रक्कम आपण परत मागू शकता. त्याकरता आपण निबंधक कार्यालयामध्ये सर्व तपशिलासह तक्रार करावी. याची एक प्रत संस्थेला द्यावी. आपल्या लेखी तक्रारीचा पाठपुरावा करावा. आपल्याला यश नक्कीच मिळेल.

सहकारी संस्था व सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत ः sharadchandra.desai@yahoo.in

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com