उच्चांकी भावालाही उत्साही सोनेखरेदी

उच्चांकी भावालाही उत्साही सोनेखरेदी

मुंबई, ता. २२ : या वर्षी सोन्याचा भाव सार्वकालिक उच्चांकावर म्हणजे दहा ग्रॅमला साठ हजार रुपयांच्या वर गेल्यानंतरही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून आला, अशी माहिती नामवंत सुवर्ण व्यावसायिकांनी ‘सकाळ’ला दिली.

आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरात ३५ टन सोनेखरेदी झाली असावी, असा अंदाज आहे. मागील वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला देशात २८ टन सोने खरेदी देशभरात झाली होती. यातील पंचवीस ते तीस टक्के वाटा महाराष्ट्राचा व चाळीस टक्के वाटा दक्षिण भारताचा असतो, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. किमतवाढीने आजच्या खरेदीवर फरक पडला नाही, लोकांमध्ये उत्साह होता. छोटे दागिने, मोठे दागिने, नाणी, वळी आदी सर्व प्रकारची खरेदी लोकांनी केली. आम्ही या वेळी नावीन्य कलेक्शन आणले होते. त्याखेरीज देशातल्या सर्व प्रकारच्या नेकलेसचा महोत्सव आम्ही काही शाखांमध्ये भरवला होता. आमच्या सवलत योजनेलाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी रकमेचा विचार केला; तर सोन्याची खरेदी वीस टक्के वाढली असावी; तर वजनाचा विचार केला, तर त्यात दहा टक्के वाढ झाली असावी, असे वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आशीष पेठे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

लोकांनी लग्नसराईसाठीदेखील आज मोठी खरेदी केल्याचे दिसून आले. मागील अक्षय्य तृतीयेला साडेएकावन्न हजारांचा असलेला सोन्याचा भाव आज साठ हजार आहे आणि पुढील वर्षी तो सत्तर हजारांवरही जाईल, अशी लोकांना शक्यता वाटत आहे. त्यामुळे आताच गुंतवणूक म्हणून आणि दागिने खरेदी म्हणून सोने घेऊन ठेवावे, असा लोकांचा कल दिसून आला. त्यामुळे भाववाढीचा अजिबात परिणाम दिसून आला नाही.
- सौरभ गाडगीळ, सीएमडी, पीएनजी ज्वेलर्स

वाहन खरेदीत घट
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या वर्षी वाहन खरेदीमध्ये घट दिसून आली आहे. गेल्या वर्षी नुकतेच कोरोनाचे सावट आणि महामारीनंतर नागरिकांसाठी बाजारपेठा उघड्या झाल्या होत्या. त्यामूळे मुंबई मध्य, मुंबई पूर्व, मुंबई पश्चिम आणि बोरिवली मिळून सुमारे ५६४ वाहनांची खरेदी झाली होती. या तुलनेत यावर्षी मात्र, ईद आणि अक्षय तृतीयचा मुहूर्त एकत्र येऊनही वाहन खरेदीमध्ये फार उच्चाक दिसून आला नाही. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत परिवहन विभागाच्या वाहन संकेतस्थळावर मुंबई मध्य, मुंबई पूर्व, मुंबई पश्चिम आणि बोरिवली परिवहन विभागांतर्गत फक्त ४६ वाहनांची नोंदणी झाल्याचे ऑनलाईन संख्या दिसून आली आहे. त्यामध्ये २७ दुचाकी; तर १९ कार खरेदी करण्यात आल्या आहे. या तुलनेत गेल्या वर्षी ४२६ कार; तर १३८ दुचाकी खरेदी करण्यात आल्या होत्या; तर राज्यभरात एकूण ६४५ वाहनांची विक्री झाली.

प्रमुख शहरातील आकडेवारी
शहर - व्रिकी झालेल्या वाहनांची संख्या
मुंबई - ४६
ठाणे - २४
नाशिक - २४
पुणे - ४३ औरंगाबाद - १६
कोल्हापूर - २०
नागपूर - २०
अमरावती - ६

स्थानिक व्यापारी चिंतेत
शिवडी, ता. २२ (बातमीदार) : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात तेजी सुरू असून १० ग्रॅम सोन्याचा भाव ६० हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त सोने खरेदी करणारा ग्राहकवर्ग जास्त आहे; परंतु सोन्याच्या भाववाढीमुळे सोने खरेदी करण्याची इच्छा असतानाही ग्राहक पाठ फिरवत आहेत; तर शास्त्र म्हणून काहींनी थोड्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली, असे झेवरी बाजारमधील इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता कुमार जैन यांनी सांगितले. सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे दुकानात सोने खरेदीसाठी हवे तसे ग्राहक येत नसल्याने सोने विक्री करणारे ज्वेलर्स चिंता व्यक्त करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com