दिव्यात लवकरच होणार आरोग्य केंद्र

दिव्यात लवकरच होणार आरोग्य केंद्र

दिवा, ता. १ (बातमीदार) : जवळपास साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दिव्यात तातडीचा आणि अत्यंत आवश्यक असलेला आरोग्याचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. यासाठी मातोश्री नगर येथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या जागेची माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी पाहणी केली असून या जागेवर सध्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या बाबी तपासल्या आहेत. दरम्यान, दिव्यातील आगासन येथे १३ एकर जागेवरील रुग्णालय होईपर्यंत मातोश्री नगर येथे भाडेतत्त्वावर जागा घेऊन आरोग्यसेवा देण्याचे काम महापालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे मढवी यांनी सांगितले.
दिव्यातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी शहरापासून साधारणपणे सात किलोमीटर अंतरावर कल्याण-शिळ चौकात पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्या ठिकाणी लगेचच जाण्यासाठी कोणतीही दळणवळणाची सुविधा नाही. त्यामुळे हे आरोग्य केंद्र दिवेकरांसाठी असूनही ते नसल्यासारखेच आहे. दिव्यातील नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र असावे, यासाठी नागरिकांची मागणी होती; परंतु येथील जागा या सीआरझेड क्षेत्रात मोडत असल्यामुळे आरोग्य केंद्र उभारणे शक्य होत नव्हते. पण आता दिव्यातील मातोश्री नगर येथे लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा मिळतील, अशी जागा भाडेतत्त्वावर मिळाली आहे. याच जागेवर हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार असून तेथील खोल्यांची रंगरंगोटी आणि सुरक्षित बाबींची तपासणी सुरू आहे.
....
मध्यवर्ती ठिकाण
मातोश्री नगर हे ठिकाण शहराच्या मध्यभागी असल्यामुळे आगासन, साबेगाव, दातिवली, गणेशनगर, बेडेकर नगर, मुंब्रा देवी कॉलनी व इतर ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांसाठी सोयीस्कर होणार आहे. याठिकाणी लवकर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com