क्राऊलर कॅमे-याने गळती आणि दूषितीकरणाचा शोध

क्राऊलर कॅमे-याने गळती आणि दूषितीकरणाचा शोध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईतील जलवाहिन्यांची गळती आणि दूषितीकरण शोधण्यासाठी आता क्राऊलर कॅमेऱ्याचा वापर होणार आहे. त्यामुळे जलवाहिन्यांच्या दुरुस्ती कामाचा वेळ वाचणार आहे. या कॅमेऱ्याचा दोन वर्षांसाठीचा वापर करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली आहे.

जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. गळतीची कामे आणखी वेगाने करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापनासाठी संबंधित जलअभियंता विभाग सतर्क असतो. दुरुस्ती वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत केला जातो. दुरुस्तीच्या कामातील वेळेची बचत होण्याच्या अनुषंगाने आता क्राऊलर कॅमेऱ्याच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
.....
असा होणार कॅमेऱ्याचा वापर
विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा क्राऊलर कॅमेरा वापरात येईल. यामुळे नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हिडीओ मिळवणे, व्हिडीओ रेकॉर्ड करणे शक्य होते. तसेच कॅमेऱ्याच्या वापरामुळे कधीही हा डेटा उपलब्ध होणे शक्य होणार आहे. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी क्राऊलर कॅमेरा जलअभियंता विभागाला गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत अतिशय उपयुक्त ठरला आहे. कॅमेऱ्याला चार चाकांमुळे २०० मीटरपर्यंतचे अंतर पार करणे शक्य आहे. या कॅमेऱ्याचे संचालन दूरसंवेदक (रिमोट)ने करणेही शक्य आहे. त्यासोबतच जलवाहिनीच्या आतील बाजूची दृश्ये टिपणे, रेकॉर्ड करण्यासाठी प्रखर दिव्यांची प्रकाशयोजनाही कॅमेऱ्याला करण्यात आली आहे.
.........
डेटा कलेक्शनसाठीही होणार वापर
जलवाहिन्यांमध्ये गळती शोधण्यासाठी उतरून काम करणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी या कॅमेऱ्याचा वापर खूपच सोईचा आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा डेटा रेकॉर्ड करण्यासही मदत होणार आहे. कॅमेऱ्याच्या वापरामुळे जलवाहिनीचा आकार, जलवाहिनीतील रुंदी किंवा निरीक्षण केलेले अंतर अशी सर्व आकडेवारी उपलब्ध व्हायला मदत होते. परिणामी गळतीचे नेमके ठिकाण किंवा दूषित स्रोत शोधणे शक्य होते. पालिकेच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून या कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. भविष्यात आणखी नवीन तंत्रज्ञान असणारा कॅमेरा विकत घेण्याचा जलअभियंता विभाग विचार करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com