दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

अहिल्या विद्यामंदिरमध्ये ‘समर कॅम्प’ उत्साहात
वडाळा, ता. २९ (बातमीदार) ः काळाचौकीतील अहिल्या विद्यामंदिरमध्ये ‘समर कॅम्प’चे आयोजन करण्यात आले होते. दहा दिवस चाललेल्या या कॅम्पमध्ये मुलांना विविध कला आणि कौशल्यांचा परिचय करून देण्यात आला. यात नृत्य, गायन, वादन असा प्रत्येक दिवशी काही तरी वेगळा विषय घेऊन तज्ज्ञ मंडळींनी प्रशिक्षण दिले. यातील सहभागी विद्यार्थ्यांनी या काळात संपादित केलेल्या कलांचे सादरीकरण पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीत केले. सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना रेखा घोलप हिने अतिशय सुरेखपणे सराव करून घेतला; तर नंदकुमार परब यांनी तबला शिकवला, वैभवी परब हिच्या गायनाने विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक आणि सहकारी मंत्रमुग्ध झाले. या विद्यार्थांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दरम्यान, येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच नवनवीन कलोपासाना करता येईल त्यासाठी शाळा व्यवस्थापन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन शाळेच्या वतीने देण्यात आले.

कला शिक्षकांचा सन्मान
मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः एन. के. ई. एस.च्या सभागृहात गुरुवारी (ता. २६) कला शिक्षकांच्‍या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कला शिक्षक संघाचे अध्यक्ष हिरामण पाटील व सचिव वीरेंद्र सोनवणे यांनी चित्रकला क्षेत्रातील शिक्षकांच्या कलेचे व कार्याचे कौतुक करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. चित्रकलेमध्ये पुरस्कार मिळालेल्यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक सचिन मोरे यांच्या भजनाने झाली व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला निरीक्षक संदीप डोंगरे उपस्थित होते. या वेळी एन. के. ई. एस. संस्थेचे व्यवस्थापक अनंत बनवासी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका उमा महेश्वरी यांनी कलाध्यापक संघाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या सत्कार समारंभात कलाशिक्षक शिवयोगी यांना ‘कला तपस्वी’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

शासकीय कागदपत्र तपासणी शिबिर
मालाड, ता. २९ (बातमीदार) ः राष्ट्र सेवा दल आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने कागदपत्र तपासणी व दुरुस्तीपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २९ आणि ३० एप्रिलला मालवणी नंबर तीन येथील सफल सेंटर १४, सेजल निवास गुजराती चाळ येथे सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे. याप्रसंगी तज्ज्ञ व्यक्ती आधार, पॅन, मॅरेज सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला व इतर शासकीय कागदपत्रे कसे बनवावीत, तसेच चुकादुरुस्ती कशा पद्धतीने करून घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक वैशाली महाडिक यांनी केले आहे.

राजाराम शेठ विद्यालयातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती
मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः राजाराम शेठ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय भांडुप येथील दोन विद्यार्थिनींना राष्ट्रीय दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती योजना परीक्षेत यश मिळाल्याबद्दल शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शाळेमधील इयत्ता आठवीमधील विद्यार्थिनी अनुष्का जागुष्टे हिने उत्तर मुंबई विभागातील सर्व शाळांमधून १० वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती मिळवली; तर कार्तिकी कदम हिलादेखील शिष्यवृत्ती मिळाली आहे. या दोन्ही विद्यार्थिनींना प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी खानविलकर आणि सर्व शिक्षकांनी या वेळी या मुलींचे अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com