नवी मुंबईवर जलसंकट

नवी मुंबईवर जलसंकट

वाशी/जुईनगर, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या मालकीचे धरण असतानाही आता पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने पाऊस लांबणीवर पडणार असल्याचे संकेत दिल्याने पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसाठ्यानुसार नियोजन केले आहे. त्यानुसार नवी मुंबईत विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवणार आहे. शुक्रवारपासून या पाणीकपातीला सुरुवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नागरिकांना पालिकेच्या मोरबे धरणाबरोबरच एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मोरबे धरणात ३८.९४ टक्के ९ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊस लांबणीवर आणि प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेता मोरबे धरणाच्या उपलब्ध साठ्यातून पुरवठा नियोजन करण्यासाठी विभागवारनुसार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, अशी माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

या दिवशी पुरवठा नसणार
सोमवार- बेलापूर
मंगळवार- कोपरखैरणे
बुधवार- घणसोली
गुरुवार- वाशी
शुक्रवार- ऐरोली
शनिवार- नेरुळ
रविवार- तुर्भे
-------
नवी मुंबई पालिका एक दिवस पाणीपुरवठा बंद सांगून दोन-तीन दिवस पाणीपुरवठा करत नाही. असे प्रकार यापूर्वी वारंवार अनुभवले आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागते. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
- सुजाता लोंढे, नागरिक

--------
पालिकेने पाणीचोरी, पाण्याचा अपव्यय यावर लक्ष द्यावे. पालिकेने योग्य नियोजन करून वेळेत पाणी सोडावे. मागच्या वेळी दोन दिवस सांगून तीन दिवस पाणीकपात केली तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये.
- सुनीता चोरे, नागरिक

नवी मुंबई पालिकेचे स्वतःच्या मालकीचे धरण असताना पाणीकपात करण्याची गरज नाही. योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोट्यवधींचा एसटीपी प्लान्ट उभारला त्याचा उपयोग उद्यानाच्या ठिकाणी होणे आवश्यक आहे. अनेक वेळा पाणी वाया जाते. योग्य नियोजन केल्यास नवी मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळेल.
- रवींद्र सावंत, कामगार नेते

अल-निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजन करण्यात आले आहे. दिघा, रबाळे आणि महापे येथे एमआयडीसीकडून पाणी घेऊन रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्यांच्याकडील शटडाऊननुसार दिघा विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईच्या जनतेने पाणी जपून वापरावे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com