पोलिसांना जेवणाचे डबे देत स्वत: बनली पोलिस कर्मचारी

पोलिसांना जेवणाचे डबे देत स्वत: बनली पोलिस कर्मचारी

प्रकाश लिमये, भाईंदर
एखादी जिद्द उराशी बाळगली आणि त्यादिशेने प्रयत्न केले तर यश नक्कीच पदरात पडते. पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांना जेवणाचे डबे पोचवताना आपणही एक दिवस पोलिस व्हायचे हे स्वप्न बघितलेल्या राणी हरसुले हिच्या बाबतीतही नेमके हेच घडले. नुकत्याच पार पडलेल्या पोलिस भरतीत भाईंदरच्या राणी हरसुले हिची पोलिस शिपाई या पदावर निवड झाली. तिने त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक होत आहे.
राणीच्या घरचा केटरिंगचा व्यवसाय. वडिलांनी अलीकडेच बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आई गेल्या पंधरा वीस वर्षांपासून जेवणाचे डबे बनविण्याचे कामही करत आहे. तिच्या या कामात अगदी शाळेत असल्यापासून राणी मदत करायची. चौथ्या इयत्तेत असल्यापासून जवळच असलेल्या नवघर पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना ती आणि तिचा मोठा भाऊ दररोज जेवणाचे डबे देण्याचे काम करत असत. सतत पोलिस ठाण्यामध्ये जात असल्यामुळे आणि पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्‍यांशी संवाद होत असल्याने राणीच्या मनात खाकी वर्दीविषयी विशेष ओढ निर्माण झाली. खाकी वर्दीतील पोलिस, त्यांची काम करण्याची पद्धत, पोलिस ठाण्यात येत असलेल्या निरनिराळ्या व्यक्तींच्या समस्या सोडविण्यासाठी ते घेत असलेली मेहनत ती दररोज जवळून पाहत असे. त्यातूनच तिलाही अगदी लहान वयातच पोलिस व्हावे असे वाटू लागले. तसे ती पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना बोलूनही दाखवत असे.
शालेय शिक्षण संपून महाविद्यालयात दाखल झाल्यानंतरही ही ओढ कायम राहिली. महाविद्यालयात असताना ती कबड्डी, कॅरमसारख्या खेळांमध्ये विद्यापीठ स्तरापर्यंत सहभागी झाली. धावणे, व्यायाम, योगाभ्यास याचीही तिला आवड होतीच. मात्र अभ्यास व कामामुळे त्यात ती जास्त प्रगती करू शकली नाही. मात्र खेळाचा व व्यायामाचा तिला पोलिस भरतीसाठी खूपच फायदा झाला. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर तिने पोलिस सेवेत भरती होण्यासाठी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ती शिकवणी वर्गालाही जाऊ लागली. तिने या मेहनतीच्या जोरावर आपले पोलिस व्हायचे स्वप्न पूर्ण केले आहे.
.....
पोलिसांकडून कौतुक
मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाकडून पोलिस भरती जाहीर करण्यात आली. या भरतीमध्ये घेण्यात येत असलेल्या शारिरिक चाचणीची तिने माहिती घेतली व त्याचा सराव सुरू केला. लेखी परीक्षेची तयारी देखील केली. तिच्या या मेहनतीचे अखेर चीज झाले व तिची नुकतीच पोलिस शिपाई म्हणून निवड झाली. तिने दाखवलेल्या जिद्दीचे व मिळवलेल्या या यशाचे नवघर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्‍यांनी व कर्मचाऱ्‍यांनीही कौतुक केले आहे.
....
निवडीमुळे लहानपणापासून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. मात्र मला याठिकाणीच थांबायचे नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलिस अधिकारी व्हायचे आहे, आणि समाजाची सेवा करायची आहे. असे मनोगत राणी हरसुले हिने व्यक्त केले आहे.
.......
शेतकऱ्यांची मुलगी बनली पोलिस कर्मचारी
बोईसर (बातमीदार) : घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मुलांना शिकवावे कसे आणि पोटाची खळगी भागवावी असा प्रश्न ज्या कुटुंबाला सतत पडलेला असायचा अशा एका कुटुंबातील मुलगी आज पोलीस कर्मचारी बनली आहे. पालघर जिल्ह्यातील बऱ्हाणपूर गावातील अमिशा घनश्याम पाटील हिची पोलिस कर्मचारी म्हणून निवड झाली आहे. पोलिस बनून शासकीय नोकरी करायची हे स्वप्न उराशी बाळगणारी अमिशा पाच वर्ष पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत होती. आता तिची निवड मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारी म्हणून झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com