कुडूसच्या सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार

कुडूसच्या सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार

वाडा, ता. २९ (बातमीदार) : तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणारी व मिनी नगरपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कोंगील, सदस्य नारायण मराड व सोनी बरफ यांनी सन २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खर्च मुदतीत सादर न केल्याने त्यांच्या विरोधात वाडा तहसीलदारांनी नोटीस बजावली होती. या नोटिशीचा आधार घेत तक्रारदार यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमाखाली अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
कुडूस ही ग्रामपंचायत तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र कोंगील, सदस्य नारायण मराड, सोनी बरफ या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी २०१६ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीनंतर त्यांनी एका महिन्यात निवडणूक खर्च सादर करणे क्रमप्राप्त होते; मात्र त्यांनी खर्च सादर केला नसल्याने वाडा तहसीलदार यांनी त्यांना नोटीस काढली होती. या नोटिशीचा आधार घेत तक्रारदार इरफान सुसे यांनी सरपंचांसह दोन सदस्यांवर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमाखाली अपात्रेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याअनुषंगाने सरपंचांसह सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी मंगळवारी (ता. २) सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी पालघर येथे सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सरपंचांसह दोन सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

------------------------
प्रशासनावरही शिस्तभंगाची कारवाई करा
गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीवेळी २०१६ मध्ये उमेदवार असलेल्यांनी निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्याने त्याचवेळी त्यांना प्रशासनाने बाद केले होते. या वेळी तालुक्यातील शेकडो उमेदवार बाद झाले होते, मग त्यावेळी जिल्हा प्रशासनाने या पदाधिकाऱ्यांची नावे बाद केलेल्या यादीत का दिली नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकाराला प्रशासनही तेवढेच जबाबदार असल्याने त्यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com