मुंबईतील जीपीओ इमारतीचे घुमट ठरतेय लक्षवेधी !

मुंबईतील जीपीओ इमारतीचे घुमट ठरतेय लक्षवेधी !

जीपीओ इमारतीचे घुमट मुंबईची नवी शान!
जीर्णोद्धारानंतर पांढराशुभ्र लूक ठरतोय लक्षवेधी

गायत्री श्रीगोंदेकर, मुंबई
दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेच्या हेरिटेज इमारती नेहमीच पर्यटक आणि मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतात. आता त्याला लागूनच असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या(जीपीओ) ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. इमारतीचे पांढरेशुभ्र घुमट मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे.
--

ऐतिहासिक वास्तू म्हणून महत्त्व असलेली जीपीओची इमारत म्हणजे पोस्ट विभागाचे मुंबई मुख्यालय. साधारण ६५० हून अधिक कर्मचारी त्या इमारतीत काम करतात. अनेक नागरिक दैनंदिन कामासाठी इथे येत असतात; मात्र देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इमारतीचे सौंदर्य आणि भव्यता कमी होत गेली. अनेकदा किरकोळ अपघातही झाले. त्याची दखल घेत इमारतीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली. लक्ष्मी हेरिकॉन प्रा. लि. कंपनीने घुमटाचा जीर्णोद्धार केला. इमारतीच्या भव्य घुमटाच्या बाहेरील आणि आतील भागाचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्याने जीपीओचे वैभव अधिक खुलले आहे. जीर्णोद्धार झालेला पांढराशुभ्र घुमट ३१ मार्च रोजी शहराला समर्पित करण्यात आला. तेव्हापासून जीपीओ इमारतीचे घुमट सीएसएमटीकडे येणाऱ्या पर्यटक आणि मुंबईकरांचे आकर्षण ठरणार आहे.

मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे ज्यांनी घुमटाचा जीर्णोद्धार प्रकल्प हाती घेतला, त्या म्हणतात की जीपीओ इमारतीची देखभाल, दुरुस्ती आणि संवर्धन करण्याची पहिलीच वेळ आहे. एक भेग संपूर्ण घुमटावर पसरत असल्याचे आढळले. त्यामुळे त्याची दुरुस्ती व संवर्धन करण्यासाठी तातडीने स्वतंत्र निविदा काढण्यात आली. सीएसएमटीसमोरील इमारतीच्या पश्चिमेकडील भागाचा पहिला टप्पा जून २०२१ मध्ये पूर्ण झाला. घुमटाचे काम नऊ महिने चालू होते. घुमटाच्या जीर्णोद्धारासाठी एक कोटी सहा लाख इतका खर्च आला. ३१ मार्च रोजी घुमट मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला.

इमारतीचे सुशोभीकरण जून २०२४ पर्यंत
जीर्णोद्धाराचे दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. अंतिम तिसऱ्या टप्प्यात इमारतीसमोरील दर्शनी भाग, मागील बाजू आणि खांबांच्या दुरुस्तीसारख्या संरचनात्मक घटकांचा समावेश असेल. त्यासाठी १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जून २०२४ पर्यंत ते काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. इमारतीच्या आकर्षक सजावटीसाठी लागणाऱ्या विजेकरिता सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’शी प्रकल्पासंदर्भात सल्लामसलत करण्यात आली आहे. अनेक अडथळ्यांमधून प्रकल्प मार्गी लागला आहे, असे मुंबई विभागाच्या पोस्टमास्टर जनरल स्वाती पांडे म्हणाल्या.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा ऐतिहासिक ठेवा
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई बंदराला लागूनच असलेली जीपीओ इमारत १९०२ मध्ये ब्रिटिश वास्तुविशारद जॉन बेग यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आली. इमारतीचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि १३ मार्च १९१३ मध्ये पूर्ण झाले. तब्बल नऊ वर्षे चाललेल्या कामासाठी १८ लाख रुपये खर्च आला होता.
- घुमटाचा व्यास ६५ फूट आहे. तो ६४ कमळांच्या खालील दिशेने असलेल्या पाकळ्यांनी वेढलेला आहे. उल्लेखनीय म्हणजे १.२० लाख चौरस मीटर चटईक्षेत्र असलेली जीपीओ इमारत इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेल्या पहिल्या इमारतींपैकी एक आहे.
- तीन प्रकारच्या खडकांत इमारतीचे काम करण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे वास्तुरचनाकार निवृत्त झाले आणि स्कॉटलंडला परत गेले. त्यांचे सहायक असलेल्या जॉर्ज विटेट यांनी आणखी काही इमारतींच्या रचना केल्या, ज्या मुंबईच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. त्यात प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय म्हणजेच आजचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि गेटवे ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
- विशेष म्हणजे कर्नाटकातील विजयपुरा (विजापूर) येथील गोल गुम्बाझनंतर जीपीओ इमारतीचे घुमट भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठा ऐतिहासिक ठेवा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com