नोकरी हवी, शेती हवी !
शेतकरी नवरा नको ग बाई !

नोकरी हवी, शेती हवी ! शेतकरी नवरा नको ग बाई !

वसंत जाधव, नवीन पनवेल
आयुष्याचा जोडीदार हा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातला असावा, असे अनेक मुलींना वाटते. परंतु कोरोनाच्या काळात या पसंतीत बदल होत असल्‍याचे पाहायला मिळाले, परंतु आता पुन्हा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील मुली मुंबई, पुण्यात राहणारा मुलगा लग्नासाठी हवा असा अट्टाहास करू लागल्या आहेत. त्यामुळे गावातील मुलांची लग्‍न कशी होणार? असा प्रश्‍न उपवरासह त्‍याच्या आईवडिलांना पडला आहे. मुलींना शेती हवी, जमीन हवी मात्र शेतकरी नवरा नको झाल्‍याने वावरातील कारभाऱ्याला आता कारभारीण मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नवीनच सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या लगीनसराईचा हंगाम सुरू आहे. मार्च ते मे महिन्यापर्यंत विवाह जुळण्याचा व ऊरकण्याचा कालावधी मानला जातो. आजच्या वैज्ञानिक युगामध्ये शिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. शिकल्या सवरलेल्या मुली व त्यांचे पालक आपल्या मुलींसाठी शिकलेला व सरकारी नोकरी किंवा चांगला पगार, घरी थोडीफार शेती असलेल्या मुलालाच पसंती देत आहेत. खासगी नोकरी आणि सध्या कमी पगार असला तरी चालेल, पण तो शहरात राहणारा असावा, अशी अपेक्षा खेडे-गावातील मुलींकडून करण्यात येत आहे.
जुन्या काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार तर नोकरी कनिष्ठ समजली जायची. मात्र आधुनिक काळामध्ये चित्र बदलले आहे. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, आणि शेतीला कनिष्‍ठ दर्जा दिला जात आहे. पूर्वी शेतीला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होती. परंतु बदलत्या काळामध्ये शेती व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे काबाडकष्ट व शेतीमुळे कुटुंबाची होत असलेली वाताहत डोळ्यांनी बघितलेली असते. त्यामुळेच सध्या तिला शेतकरी नवरा नको आहे. दाण्यापासून हजार दाणे करणाऱ्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. शेतकऱ्याने शेती पिकवलीच नाही तर अन्न निर्माण कसे होईल! म्हणून तो अन्नदाता ठरतो. या कुठल्याही बाबीचा राज्यकर्ते विचार करत नसल्याने आज शेती परवडेनाशी झाली आहे.

चौकट
साधारण नोकरी वाल्यांवरही संक्रांत
पूर्वी पुण्या-मुंबईची नोकरी चालायची, मुंबईसारख्या शहरातील मुले मुलींना पसंतीत असायची. मात्र, सरकारी व जास्त पॅकेजची नोकरी सोडली तर सर्वसामान्य घरातील सामन्य नोकरीवाल्यांची दशाही शेतकऱ्यांसारखीच झाली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्‍या. खासगी नोकरीच्या धास्तीने अनेक वेळा बोलणी फिस्कटल्याचे मुंबई उपनगरीय परिसरात राहणाऱ्या एका युवकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

बागायतदारांना पसंती
पुण्या-मुंबईतील गावाशी नाळ असलेले पालक मात्र शेतकरी, बागायतदार, जमीनदार, सुखवस्तू शेतकरी कुटुंबात लग्नगाठ बांधायला तयार होतात. गाडी, बंगला व एकरी बागायती- शेती याला पसंती दिली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com