खासगी वाहतुकदारांची टप्पा वाहतूक

खासगी वाहतुकदारांची टप्पा वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : उन्हाळ्याच्या सुट्टीची मज्जा घेण्यासाठी चाकरमानी कोकणची वाट धरत असतात. वडीलधाऱ्यांना नोकरीतून वेळ मिळत नसला, तरी मुलांना कोकणचे वैभव दाखवण्याचा हा चाकरमानीचा दरवर्षी अट्टहास असतोच असतो. याचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहतूकदार सर्रास बेकायदा पद्धतीने टप्पा प्रवासी वाहतूक करताना दिसून येत आहेत. कोकणात रत्नागिरी, कणकवली, राजापूर मार्गावर धावणाऱ्या प्रत्येक गावाची नाव लिहून त्याचे फलक मुंबईत ठिकठिकाणी झळकावून लोकांना आकर्षित करण्याचे काम केले जात असून, याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य परिवहन विभागाकडून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याप्रमाणे खासगी प्रवासी वाहतुकदारांना पॉईन्ट टु पॉईन्ट प्रवासी वाहतूक करण्याचेच परमीट देण्यात आले आहे. तर एसटी महामंडळाच्या सार्वजनिक प्रवासी सेवेची टप्पा वाहतुकीची मक्तेदारी असून, त्यासाठी शासनाला करसुद्धा भरला जातो; मात्र त्यानंतरही मुंबईसह राज्यभरात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून टप्पा वाहतूक केली जात आहे. चाकरमानींना आकर्षित करण्यासाठी मुंबईत सर्वत्र खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे अनधिकृत फलक लावण्यात आले असून, यावर परिवहन विभागाकडून मात्र कोणतीही कारवाई होताना दिसून येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुंबई सेंट्रल, परळ, दादर, कुर्ला अशा सर्वच परिसरात खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून बॅनर झळकवण्यात आले आहेत. मुंबई सेन्ट्रल, दादर आणि कुर्ला नेहरूनगर या ठिकाणी अगदी एसटी डेपोच्या आवारातच खासगी ट्रव्हल्सवाल्यांनी आपला धंदा थाटला आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या उन्हाळ्यातील उत्पन्नाचा हंगाम खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या पळवत असल्याचेही दिसून येत असताना एसटी प्रशासनाकडूनही खासगीच्या बेकायदा प्रवासी वाहतुकीविरुद्ध कोणतीही कारवाई किंवा तक्रारी दिसून येत नसल्याने एसटीचे स्थानिक अधिकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये पाणी मुरत असल्याचेही बोलले जात आहे.

खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून सुरू असलेली टप्पा वाहतूक बेकायदा आहे. कोणाच्या जिवावार खासगी ट्रॅल्हल्स मालक, चालक प्रवासी वाहतूक करतात, हा संशोधनाचा विषय आहे. टप्पा वाहतूक करण्याची फक्त एसटीला परवानगी आहे. त्यामुळे शासनाचे आणि एसटीचे दोघांचेही नुकसान आहे. एसटी महामंडळाला बंद पाडण्याचे हे छुपे धोरण असल्याचे दिसून येत आहे.
- दीपक चव्हाण, कार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ

पोलिस अधिकारी व आरटीओ अधिकारी यांचे खासगी वाहतूकदारांसोबत लागेबांधे असल्‍याचे वाटत आहे. त्यामुळेच अशा अवैध वाहतुकीला बळ मिळत आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com