४२४ लघुउद्योजक रडारवर

४२४ लघुउद्योजक रडारवर

वाशी, ता. १ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील १,६५० लघुउद्योजकांपैकी ४२४ जणांनी अद्यापही पालिकेचा मालमत्ता कर भरलेला नाही. त्यामुळे जवळपास १४८ कोटी ६१ लाखांची थकबाकी असून उच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका सरसावल्याचे चित्र आहे.
नवी मुंबई महापालिकेने २०२२-२३ आर्थिक वर्षात ६३२ कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यामुळे पालिकेने आता थकीत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीवर जोर लावला आहे. नवी मुंबईतील लघु उद्योजकांकडून मालमत्ता कर वसूल करण्याचा २००१ पासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागलेला असून महापालिकेस जवळजवळ २०० कोटींच्या जवळपास महसूल प्राप्त होण्याचा अंदाज आहे. त्यातील ४२४ जणांनी महापालिकेचा मालमत्ता कर भरणार नाही, अशी भूमिका घेऊन आधी उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने सविस्तर आदेश पारित करताना २ ऑगस्ट २०२३ रोजी पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. तसेच दरम्यानच्या कालावधीत थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरला नाही तर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर पालिकने आता थकीत वसुलीसाठी नोटिसा बजावल्या आहेत.
-------------------------------------------------------
उच्च न्यायालयात याचिका फेटाळली
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील लघुउद्योजकांच्या संघटनेने २००१ मध्ये उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल करून नवी मुंबई महापालिकेस मालमत्ता कर भरणा करणार नाही, अशी भूमिका याचिकेमध्ये घेतली होती. रिट याचिका दहा वर्षे उच्च न्यायालय, मुंबई येथे प्रलंबित होती. याचिकेवर ८ जुलै २०१० रोजी न्यायमूर्ती पी. बी. मुजुमदार आणि आर. जी. केतकर यांच्या खंडपीठाने सविस्तर आदेश करून ही याचिका फेटाळून लावली आणि लघुउद्योजकांच्या संघटनेला नवी मुंबई महापालिकेकडे मालमत्ता कर भरण्यासाठी आदेशित केले होते.
--------------------------------
लघुउद्योजक संघटनांच्या भूमिकेवर लक्ष
नवी मुंबईतील अनेक लघुउद्योजकांनी व लघुउद्योजकांच्या संघटनेच्या काही सदस्यांनी मालमत्ता कराची फक्त मुद्दल रक्कम नवी मुंबई महापालिकेकडे जमा केली होती. काही उद्योजकांनी काहीच रक्कम जमा केलेली नाही; परंतु आता न्यायालयाच्या आदेशानुसार लघुउद्योजकांना मालमत्ता कर भरावाच लागणार आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत कार्यवाही सुरू केली असून लवकरच मालमत्ता थकबाकीदारांना वसुली नोटीस पाठवली जाणार असल्याने नोटीस प्राप्त झाल्यानंतर लघुउद्योजक संघटना काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
---------------------------------
मालमत्ता कराबाबतची सद्यस्थिती ः
कर न भरलेले - ४२४
दंड न भरलेले - ५९७
नियमितपणे कर भरणारे - ९९५
शहरातील एकूण लघुउद्योजक -१,६५०
----------------------------------------------------
उच्च न्यायालयाने लघुउद्योजकांच्या याचिकेबाबतच्या सुनावणीत दिलेल्या निर्देशानुसार आमच्या संघटनेच्यावतीने सविस्तर विचारविनिमय सुरू आहे. सर्वांच्या अनुमतीने याबाबत भूमिका घेतली जाईल.
- के. आर. गोपी, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज
----------------------------------------
उच्च न्यायालयाने पालिकेला दिलेल्या निर्देशानुसार पालिकेने कार्यवाही सुरू केली असून संबंधितांना वसुली नोटिसा पाठवण्यात येत आहेत. पालिकेकडून या उद्योजकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबतचे स्पष्ट चित्र न्यायालयापुढे मांडल्यामुळेच थकीत वसुलीचे निर्देश दिले आहेत.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com