दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

मुलुंड पूर्वेतील जुना रस्ता सुरू
मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः मुलुंड पूर्व रेल्वेस्थानकाजवळ बबनराव कुलकर्णी मार्ग आणि संत तुकाराम मार्गाला जोडणारा एक जुना रस्‍ता आहे. १९६० मध्ये हा रस्ता समाजसेवक हनुमान कांडपिळे यांनी जागेचे मालक कुलकर्णी यांच्याकडून वहिवाटीसाठी विकत घेतला आणि स्थानिक लोकांसाठी ती सुविधा कायम करून दिली; मात्र कालांतराने हा रस्ता काही तांत्रिक अडचणींमुळे बंद केला गेला. १९८१ मध्ये लोकप्रतिनिधी बाळ धारप यांच्या मध्यस्थीने हा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला; मात्र काही वर्षांनंतर तो बंद ठेवण्यात आला. परिणामी नागरिकांची त्यामुळे गैरसोय होऊ लागली. ही बाब नागरिकांनी आमदार मिहिर कोटेचा यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्‍यांनी या समस्येचे निवारण करून स्थानिक लोकांना दिलासा दिला आहे. हा रस्ता नागरिकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आल्याने आरपीएफपासून रिद्धी सिद्धी, चिंतामणी व इतर स्थानिक सोसायटींमधल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना हनुमान चौक, सुयोग या लोकवस्तीकडे जाणे सोयीचे ठरणार आहे.

गोरेगावमध्‍ये आधार शिबिर
मालाड, ता. १ (वार्ताहर) ः महाराष्ट्र दिनानिमित्त साद-प्रतिसाद व हनुमान शिव उत्सव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने गोकुळधाम परिसरात शिव हनुमान मंदिर येथे सोमवार (ता. १) ते बुधवार (ता. ३) पर्यंत आधार शिबिराचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. नोंदणीसाठी ९८२१०३०८४१ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या आधार शिबिरात नवीन आधार, आधारमधील दुरुस्त्या, आधार अपडेट करण्यात येणार आहे. या शिबिराला अप्पर उपजिल्हाधिकारी सुनील माळी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

आठ विद्यार्थ्यांनी मिळवले ब्लॅक बेल्ट
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः जयेश ट्रेनिंग क्लासेसचे रायगड जिल्हा आणि पेण तालुक्यातील जवळपास आठ विद्यार्थ्यांनी साऊथ कोरिया कुक्किन येथे परीक्षा देऊन ब्लॅक बेल्ट संपादन केले. या परीक्षेत पूर्वा पाटील, कुंदन रणपिसे, कुणाल रणपिसे, शाखिर अली खान, अभिषेक इर्लेकर, सिद्धी लांगी, आदर्श कोठेकर, पूर्वेश म्हात्रे यांचा समावेश असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सात ते आठ वर्षे सतत सराव करून ही परीक्षा उत्तीर्ण केली. यातील काही विद्यार्थी जिल्हा व राज्य स्तरावर पदकविजेते आहेत. या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी. डी. पाटील आणि मास्टर जयेश वेल्हाळ यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी जयेश ट्रेनिंग क्लासेसचे मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहप्रशिक यश दळवी, कृपेश रणक्षेत्रे, चंदन परिदा, निखिल पवार हेसुद्धा उपस्थित होते.

या बालकाचे पालक कोण?
जोगेश्वरी, ता. १ (बातमीदार) ः बाल कल्याण समितीच्या आदेशाने मीरा (अंदाजे वय १० दिवस) या बाळाला २५ एप्रिलला आशा सदनमध्ये सुरक्षितता व पुनर्वसन हेतू दाखल करण्‍यात आले आहे. त्‍यांच्‍या पालकांना संस्थेच्या अधीक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या बाळाच्‍या पालकांनी महाराष्‍ट्र स्‍टेट कौन्सिल आशा सदन, आशा सदन मार्ग, उमरखाडी येथे किंवा ०२२-२३७१५४७७/२३७४०३९७ या क्रमांकावर संपर्क करावा असे सांगितले आहे.

कागदपत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालाड, ता. १ (बातमीदार) ः राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने शासकीय कागदपत्र तपासणी व दुरुस्तीयाबाबत दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी तज्ज्ञ व्यक्तींनी आधार, पॅन, मॅरेज सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला व इतर कागदपत्र कसे बनवावे, तसेच चुका दुरुस्ती कशा पद्धतीने करून घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. या संधीचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला, अशी माहिती आयोजक वैशाली महाडिक यांनी दिली.

चेंबूरमध्ये पदपथावर कचरा
चेंबूर, ता. १ (बातमीदार) ः चेंबूर येथील मार्ग क्रमांक सातवरील बडोदा बँकेसमोरील पदपथावर अनेक दिवसांपासून जवळील बागेतील कचरा टाकण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. पावसाळा जवळ आल्‍याने मुंबईत खासगी जागेतील झाडे तोडून त्‍याचा कचरा पदपथांवर टाकला जात असल्‍याने याचा त्रास प्रवाशांना होत आहे. पदपथावर असा कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करावी व पालिकेने हा कचरा लवकरात उचलावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दिंडोशी पोलिस ठाण्यात क्रिकेट खेळाडूंचा सत्कार
मालाड, ता. १ (बातमीदार) ः दिंडोशी पोलिस ठाण्यात मुंबई पोलिस व मोहल्ला कमिटी मूव्हमेंट ट्रस्ट परिमंडळ १२ च्या वतीने खेळाडूंचा सत्कार सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. नुकत्‍याच पार पडलेल्‍या क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये परिमंडळ १२ अंतर्गत सात पोलिस ठाण्यांमधून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी दिंडोशी, वनराई व आरे पोलिस ठाण्यातर्फे खेळणाऱ्या खेळाडूंचा दिंडोशी पोलिस ठाण्यात सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी राजू चौधरी, मनोहर राजगुरू, विश्वनाथ दामोदर, शोएब आलम अन्सारी यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com