आजपासून एसटीची ई- बस धावणार

आजपासून एसटीची ई- बस धावणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प केला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी, अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सह्याद्री अतिथिगृहावर ई-शिवनेरी बसचे लोकार्पण पार पडले; तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याशिवाय अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. मुंबई-ठाणे-पुणे द्रुतगती महामार्गावर येत्या काळात १०० इलेक्ट्रिक शिवनेरी बस धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गेल्या आठनऊ महिन्यांत राज्यातील रखडलेल्या कामांना चालना देण्यात आली आहे. पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडवणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या आठ कोटींपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवासी याचा लाभ घेत आहेत. यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.


----------
स्वच्छ सुंदर बसस्थानकासाठी स्पर्धा
एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेचा कालावधी एक वर्षाचा राहणार असून एकूण ५८० बस स्थानकांवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व बस स्थानकांचे अ वर्ग शहरी, ब वर्ग निमशहरी आणि क वर्ग ग्रामीण वर्गीकरण करण्यात आले आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सुमारे दोन कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.


----------------
शिवनेरीत महिला, ज्येष्ठांना सवलत
सध्या ८ बसच्या माध्यमातून ठाणे-पुणे या मार्गावर ई-शिवनेरी बस धावणार आहे. लवकरच शिवनेरीचा संपूर्ण ताफा ई-शिवनेरीमध्ये रूपांतरित होणार असून यामध्ये ठाणे-पुणे मार्गावर पूर्ण तिकीट ५१५ रुपये, महिलांना व ६५ ते ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना २७५ रुपये; तर अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.


--------------
कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते. आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात. तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते. त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

----------
अमृतमहोत्सवी वर्षात एसटीचा सदिच्छा दूत म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. लहानपणापासून एसटीच्या फार आठवणी आहेत. ग्रामीण भागात एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील कानाकोपऱ्यात नाटक, चित्रपटांच्या शुटिंगच्या निमित्तानेसुद्धा एसटीने अनेक वेळा प्रवास करण्याचा योग आला, तेव्हा अत्यंत सुंदर अनुभव आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एसटीच्या सदिच्छा दूत म्हणून दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे.
- मकरंद अनासपुरे, अभिनेता, एसटी सदिच्छा दूत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com