लाचप्रकरणी उपायुक्त पटनीगीरे यांची चौकशी

लाचप्रकरणी उपायुक्त पटनीगीरे यांची चौकशी

नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : तब्बल पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या परिमंडळ-२ च्या कार्यालयातील लिपीक दिनेश सोनवणे याला अटक केली आहे. सोनवणे याने परिमंडळ-२ चे उपायुक्त अमरिश पटनिगीरे यांच्या सांगण्यावरून तक्रारदार कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरिश पटनिगीरे यांची या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे महापालिका प्रशासनानेदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत असलेला तक्रारदार कनिष्ठ अभियंता रितेश पुरव याची परिमंडळ-२ चे उपआयुक्त अमरिश पटनिगीरे यांनी काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या मुख्यालयात बदली केली होती. ही बदली पूर्ववत करण्यासाठी रितेश पुरव याने परिमंडळ-२ चे उपआयुक्त अमरिश पटनीगीरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी पटनीगीरे यांनी कोपरखैरणे येथील परिमंडळ-२ च्या कार्यालयातील लिपीक दिनेश सोनवणे याला भेटण्यास, तसेच तो जे सांगेल त्याप्रमाणे करण्यास सांगितले होते. त्यानुसार रितेश पुरव याने दिनेश सोनवणे याची भेट घेतली होती. त्यावेळी सोनवणे याने पाच लाख रुपये दिल्यानंतर तत्काळ त्याची बदली रद्द करून ऑर्डर काढणार असल्याचा निरोप पटनिगीरे यांनी दिल्याचे पुरव याला सांगितले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोपरखैरणे येथील परिमंडळ-२ च्या उपआयुक्तांच्या कार्यालयात सापळा लावून लिपीक दिनेश सोनवणे याला ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याच्याविरोधात कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com