वज्रमूठ उद्धव ठाकरे

वज्रमूठ उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. १ : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ‘वज्रमूठ’ हिंदुत्वाच्या भगव्या तेजाने उंच फडकावण्यासाठी, महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचे वस्त्रहरण थांबवण्यासाठी एकत्र आली आहे. आता महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लावल्या तरी जमीन काय असते, हे दाखवण्यासाठी तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय महाराष्ट्रातला माणूस राहणार नाही, असे थेट आव्हान भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. कसब्यापासून बाजार समितीच्या निवडणुकीतही विरोधकांना चारीमुंड्या चित करून ‘वज्रमूठ’चा हिसका दाखवला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी ललकारले.

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत बीकेसी येथे झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या सभेला तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारवरही निशाणा साधला.

उद्धव यांनी भाषणाच्या सुरुवातीला हुतात्मा चौकात रविवारी (ता. ३०) अभिवादन करायला शिवसैनिकांसोबत गेले असताना त्या ठिकाणी कोणतीही फुलांची सजावट सरकारकडून केली नव्हती, विभागातील शिवसैनिकांनी ती केल्याची गंभीर बाब ठाकरे समोर आणत राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘मुंबईसाठी हुतात्मे झाले म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि गद्दारी करून का होईना, तुम्हाला मुख्यमंत्री होता आले,’ अशी सडकून टीका करत भाषणाची सुरुवात ठाकरे यांनी आक्रमकपणे केली. या वेळी ठाकरे यांनी मोरारजी देसाई यांनी कशा प्रकारे मुंबईकरांवर लाठीहल्ला केला याची आठवण सांगितली.

६ मे बारसूमध्ये जाणार
बारसू काही पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये नाही. मला कोण अडवतंय ते मी पाहतोच, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. मी मुख्यमंत्री असताना दिलेले पत्र दाखवून हे बारसूचे बारसं करतायत, पण मी पोलिसांना घुसवून लाठीहल्ला करून जमीन मिळवा असे पत्र दिले नव्हते; तर तेथील लोकांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. त्यांची इच्छा असेल तरच; ही आमच्या सरकारची अट होती, असेही ठाकरे यांनी स्पष्ट करत ६ मे रोजी बारसूमध्ये जात असल्याचे जाहीर केले. त्याच दिवशी महाडमध्ये सभेला संबोधित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जनता आपल्यासोबत आहे हे विविध पोटनिवडणुका, विधान परिषद निवडणुका आणि आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आपण एकत्रपणे वज्रमूठ बांधून काम करू या. दोन पावले पुढे-मागे झाली तरी तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच प्रचार करावा.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते

भाजप हा शेतकरीविरोधी आहे, हे बाजार समितीच्या निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे. या सरकारने आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच पाहावे, लोकशाही संपुष्टात आणणाऱ्या सरकारविरोधात महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ पक्की बांधली आहे, हे त्यांना निकालातून दिसेल.
- नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

अगोदर डबल इंजिनचे सरकार मागत होते, आता मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी ट्रिपल इंजिन सरकार द्या, असे भाजपचे नेते म्हणत आहेत; पण महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास घडवून भविष्य बनवू शकते हा विश्वास आहे.
- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com