आश्नासनांना भूलल्याने देशाची बरबादी!

आश्नासनांना भूलल्याने देशाची बरबादी!

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. १ : ‘निवडणूक आली की घरावर सोन्याची कौले टाकण्याची आश्वासने दिली जातात. त्याला तुम्ही भुलता आणि मतदान करता; पण जिंकून आल्यावर मात्र तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करायचा, मग तुम्ही कामधंदा सोडून त्याच्याच मागे लागता. तुम्हाला कळतही नाही, की तुमच्या आयुष्याची बरबादी होते आणि देशाचीही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या प्रचार यंत्रणेच्या कामाची पद्धत समजावून सांगितली. कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदाणींच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी केली, त्याचाही उल्लेख ठाकरेंनी केला. अदाणींची चौकशी करण्यापेक्षा त्यांचे आत्मचरित्र अभ्यासायला लावा, अशी खिल्ली त्यांनी उडवली. गरीब, कष्टकरी जनतेला श्रीमंत होण्याचे धडे तरी मिळतील, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. बुलेट ट्रेनसाठी पालघरमधल्या आदिवासींना मोबदला न देता घरातून बाहेर काढले जातेय आणि बारसूच्या ग्रामस्थांवर तुम्ही जबरदस्ती करताय. यांचे शाप भोगल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, असा तळतळाटही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

बुलेट ट्रेनला सोन्याची जमीन
बुलेट ट्रेनने कोण मुंबईकर नेहमी अहमदाबादला जाणार, असा प्रश्नही ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला. मुंबईतली सोन्यासारखी जमीन बुलेट ट्रेनला दिली, याबाबत ठाकरे यांनी संताप वक्त करत राज्यातली महत्त्वाची कार्यालये, उद्योग गुजरातला जात असल्याबाबत चिंता वक्त केली. ठाकरे म्हणाले, भांडवलदार वृत्तीतून हे ओरबाडणे सुरू आहे. महाराष्ट्रापासून मुंबई तोडता येत नाही, तर मुंबईची हत्या करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. त्यासाठी मुंबई कमजोर केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला.

चीन राष्ट्राध्यक्षांच्या घरी ईडी पाठवा
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावरून केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्याचा समाचार ठाकरेंनी या वेळी घेतला. चीन देशाचा भूगोल बदलतोय आणि हे देशाचा इतिहास बदलतायत. अगोदर इतिहास घडवा, मग तो आपोआप लिहिला जाईल, असा सूचक सल्लाही ठाकरेंनी दिला. झोपडपट्टीत राहणाऱ्या शिवसैनिकांच्या घरी सीबीआय आणि ईडी पाठवता. हिंमत असेल तर चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरीपण ईडी पाठवा आणि मग ईडी परत येतेय का पाहा, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

‘देखो आपला महाराष्ट्र’ चालणार नाही
महाराष्ट्र दिनानिमित्त पर्यटन विभागाने ‘देखो आपला महाराष्ट्र’ अशा केलेल्या जाहिरातीचाही उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. आम्ही मराठी सक्तीची केली होती; पण यांनी मराठी शिकवायची की नाही हे ऐच्छिक ठरवले असल्याबाबत ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

कोकणातील आंबा उत्पादकांना मदत द्या
राज्यभरात अवकाळीने शेतकरी त्रस्त आहे. मदत जाहीर केली जाते, पण कोणाला ती मिळत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. कोकणातल्या आंबा उत्पादकांना प्रत्येक झाडामागे मदत देण्याची मागणीही त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com