दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

कामगार दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
मालाड, ता. २ (बातमीदार) ः जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांच्या कल्याणासाठी वेगवेगळे कायदे बनवणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्‍या दामूनगर शाखेतर्फे अभिवादन कारण्यात आले. या वेळी रिपाइंचे उत्तर मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख संजय बोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सुंदर लांडगे, बाबू काळे, अधिकार पाडमुख, जनार्दन कोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

धारावीत महाराष्ट्र दिन उत्साहात
धारावी, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्र दिन व कामगार दिन धारावीत विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, राजकीय पक्षांनी उत्‍साहात साजरा केला. संत कक्कया विकास संस्था संचालित श्री गणेश विद्या मंदिर येथे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी शाळेचे वरिष्ठ शिक्षक राजाराम आरोटे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची माहिती उपस्थितांना दिली; तर संस्थेचे सहसचिव नरसिंग कावळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव राजेश खंदारे, मुख्याध्यापक चंद्रशेखर बांदिवडेकर आदी उपस्थित होते. तसेच धारावीतील अनेक ठिकाणी मिठाईवाटप करण्यात आले. धारावी पोलिस ठाणे येथेही महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

महिलांच्‍या स्वयंरोजगारासाठी केकचे प्रशिक्षण
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः महिला सक्षमीकरणासाठी मुंबई महापालिकेचा नियोजन विभाग नेहमीच कार्यरत असतात. याच अनुशंगाने पालिका एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनवणे आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटातील महिलांना दोन दिवसाचे केकचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विविध प्रकारचे केक शिकवण्यात आले. या वेळी बचत गटातील २० ते २५ महिला केक प्रशिक्षण घेण्यासाठी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला पालिकेच्या समाज विकास अधिकारी सरला राठोड, रोटरी क्लब मुंबई घाटकोपरचे सुनील पुराणिक हे उपस्थित होते. सहभागी महिला बचत गटांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रशिक्षण मंजू भागवत यांनी दिले. या उपक्रमास समुदाय संघटक मनीषा माने आणि संगीता हिरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी केला असल्याचे समाज विकास अधिकारी सरला राठोड यांनी सांगितले.

ईशान्य मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम
मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या संवादाच्‍या ‘शतकोत्सवा’निमित्त खासदार मनोज कोटक यांनी स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि मोहिमेनंतर सर्वांनी एकत्र येत पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक ‘मन की बात’ ऐकले. याप्रसंगी महाराष्ट्र शासन पर्यटनस्थळ विकासासाठी मूलभूत सुविधा अनुदानअंतर्गत नागरी सुविधा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी श्रीनिवास त्रिपाठी, वैशाली पाटील, विलास सोहनी, संजय शुक्ला, प्रदीप गुप्ता, आरिफ सिद्धीकी, उमेश आचार्य आदी पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

गुणवंत कामगारांचा सत्कार
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः अदाणी इलेक्ट्रिसिटी स्थानीय लोकाधिकार समिती, विद्युत कामगार सेना व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बीकेसी बांद्रा येथील कार्यालयात कामगार दिनी गुणवंत कामगारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव अनिल देसाई, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ सोहळा पार पडला. या वेळी सरचिटणीस मंगेश दळवी, अध्यक्ष वामन कदम, मानवसंधान विभागाचे अमित गोरे आदींसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्‍यान कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा आणि परिसंवाद या वेळी घेण्यात आला.

ईद मिलन कार्यक्रम
धारावी, ता. २ (बातमीदार) : महाराष्ट्र मुस्लिम कॉर्डिनेशन कमिटीतर्फे नुकतेच ईद मिलाद कार्यक्रमाचे आयोजन बोरीबंदर येथील अंजुमन इस्लामच्या आवारात करण्यात आले होते. या वेळी मुंबईतील विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, नेते, विविध धर्माचे गुरू व प्रमुख तसेच अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले. माजी खासदार हुसेन दलवाई यांनी या वेळी असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे तसेच सर्वधर्मीय लोकांना एकत्र करून समभाव वाढीस लावला पाहिजे, असे सांगितले. आमदार कपिल पाटील यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. तसेच जनता दल (सेक्युलर)चे महाराष्ट्र महासचिव रवी भिलाने, माजी मंत्री महादेव जानकर आदी नेत्यांनी आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल मातीन खान यांनी केले होते.

सफाई कर्मचाऱ्यांना कपडेवाटप
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनानिमित्त भाजप प्रभाग क्रमांक १२७च्या वतीने सफाई कर्मचारी महिला व पुरुषांना कपडेवाटप करण्यात आले. खासदार मनोज कोटक आणि आमदार राम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड अध्यक्ष गणेश भगत यांच्या वतीने कामगार महिलांना साडी व पुरुषांना शर्टचे वितरण करण्यात आले. घाटकोपर कातोडी पाडा येथील भाजप कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी विनोद जाधव, रमेश शिंदे, राजेश अहिरे, श्रीकांत सुर्वे, नूपुर सावंत, सुषमा मंचेकर उपस्थित होते. या वेळी विभागातील ५० हून अधिक कामगारांना कपडे वितरित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com