खोदलेल्या रस्त्यांमुळे डोक्याला ताप

खोदलेल्या रस्त्यांमुळे डोक्याला ताप

वाशी, ता. २ (बातमीदार)ः नवी मुंबईमध्ये सध्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मलनिस्सारण वाहिन्या, महानगर गॅसची पाईप लाईन, पाण्याची वाहिन्या, भूमिगत विद्युत वाहिन्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवण्यात आले असल्यामुळे दुचाकीचालकांसह पादचाऱ्यांचा प्रवास जिकिरीचा झाला आहे.
शहरात सध्या विविध ठिकाणी विकासकामे केली जात आहे. यात रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासह विविध कामांचा समावेश आहे. यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे; तर अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी सुरू असलेल्या या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. वाशी येथील अग्निशमन केंद्राजवळ, कोपरखैरणे ब्ल्यू डायमंड चौक, महापे येथील भुयारी मार्ग रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी कामे अतिशय संथगतीने होत असल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना दररोजच्या रस्त्यांमध्ये बदल करावा लागत आहे; तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असताना कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आली नसल्याने वाहतूक कोंडीतही भर पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पुढे जाऊन माघारी परतावे लागत असल्याने शाब्दिक चकमकीदेखील होत आहेत.
------------------------------------------------
प्राधिकरणांमधील विसंवादाने भर
रस्त्यांवरील वाळू, सिमेंट भुशाची कच तशीच पडून राहिल्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. अशातच महापालिका, महावितरण, महानगर गॅस अशा प्राधिकरणांमधील विसंवाद अधिकच भर टाकत आहे. कोणताही विचारविनिमय नसल्यामुळे रस्ते वारंवार खोदण्यात येत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.
-----------------------------------
मान्सून सुरू होण्याआधीच रस्त्यांच्या खोदकामाची परवानगी देणे बंद करण्यात आलेली आहे. तसेच जी कामे सुरू आहेत, ती पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याकडे पालिकाची प्राथमिकता आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com