समाजमाध्यमांवर झळकणार शासकीय योजनांचे ‘रिल्स’

समाजमाध्यमांवर झळकणार शासकीय योजनांचे ‘रिल्स’

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : सध्या समाजमाध्यमांवर ‘रिल्स’ची क्रेझ वाढली आहे. विशेषतः तरुणाईमध्ये हे शॉर्ट व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहेत. नेमकी हीच ‘नस’ ओळखून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आता शासकीय योजनांची माहिती रिल्सच्या माध्यमातून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या रिल्सचे अनावरण ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते झाले. राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीच्या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे यांना निधी वितरित करण्यात आला होता. सन २०२२-२३ या वर्षाच्या निधीतून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची विविध उपक्रमांद्वारे जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसिद्धी केली. यामध्ये जिल्ह्यातील विविध गावांमध्ये लोककला, पथनाट्याच्या माध्यमातून योजना पोचवण्यात आल्या. अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी जिल्ह्यातील १० महाविद्यालयांमध्ये प्रथमच एकदिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामुळे अनेक योजनांची माहिती नव्याने झाली. तसेच करिअरची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरण्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले होते.

आता हे सर्व उपक्रम व्यापक स्वरूपात जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचावेत, यासाठी रिल्सची कल्पना पुढे आली. कारण बहुतेक जण दिवसांतून काही वेळ का होईना, समाजमाध्यमांवर ‘फेरफटका’ मारतातच. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवर प्रसारित ह‍ोणारी रिल्स व्हायरल होतात. हाच धागा पकडून ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने आता शासकीय योजनांचे अनोखे रिल्स प्रसारित करण्याचे ठरवले आहे. या रिल्सचे अनावरण महाराष्ट्र दिनी काल (ता. १) करण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे आदी उपस्थित होते.

कोणत्या योजना आहेत रिल्समध्ये?
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रसिद्धी समाजमाध्यमांतून करण्यासाठी रिल्सचा वापर करण्याचे नियोजन जिल्हा माहिती कार्यालयाने केले. अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गासाठी असलेल्या पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, यूपीएससीच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी आर्थिक मदत, स्टँडअप इंडिया, शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, मुलींसाठी असलेल्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत या योजनांचे रिल्स तयार करण्यात आले आहेत.

जिल्हा माहिती कार्यालयाने राबविलेले उपक्रम अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहचल्यास योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल. अधिकाधिक योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत.
- अशोक शिनगारे,
जिल्हाधिकारी, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com