समाजमाध्यमांवरील अतिउत्साहाने चोरांना निमंत्रण

समाजमाध्यमांवरील अतिउत्साहाने चोरांना निमंत्रण

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : परीक्षा संपल्या की सुट्टीच्या हंगामाला सुरुवात होते. अनेक कुटुंब हे मूळ गावी अथवा बाहेरगावी जाण्याच्या तयारीला लागतात; तर काही उत्साही नागरिकांकडून बाहेरगावातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातात; पण या प्रकारामुळे चोरट्यांना आयतीच संधी मिळत असल्याने बाहेरगावी जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सुट्टीच्या दिवसात अनेक कुटुंबे हे बाहेरगावी जातात. बाहेरगावी फिरण्यासाठी गेल्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर त्याचे फोटो टाकले जातात. नेमकी हीच संधी साधत सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या चोरांकडून बाहेरगावी गेलेल्या कुटुंबीयांची माहिती मिळविली जाते. अशा प्रकारे माहिती मिळवून अनेक घरफोड्या झाल्याचे प्रकार नवी मुंबईतही घडले आहेत. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांनी आपले फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून घर बंद असल्याची माहिती चोरट्यांना देऊ नका, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------------------------------------
पोलिसांनी केलेल्या सूचना
- गावाला जाताना किंवा बाहेर जाताना, घर नीट बंद करा; तसेच आपण बाहेर जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्या.
- जास्त काळ बाहेरगावी जायचे असल्यास आपल्या घरात जास्त पैसे, सोन्याचे दागिने ठेवू नका.
- बाहेर जाताना कपाटाच्या चाव्या सोबत घेऊन जावे, तसेच मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा.
- घरात नोकर ठेवताना, नोकराचे संपूर्ण नाव, गाव, वय, राहण्याचा पत्ता व संपर्क क्रमांक घेऊन ठेवा.
- नोकरास ओळखणाऱ्या परिसरातील दोघांची नावे, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घ्या.
- रात्री झोपताना घराची दारे, खिडक्या, कंपाउंडचे गेट व्यवस्थित बंद असल्याची खात्री करा.
--------------------------------------------------------------
चोरी झाल्यानंतर नागरिकांकडून पोलिसांच्या नावाने ओरड केली जाते. मात्र, चोरी होऊ नये, यासाठी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने घरफोडीच्या घटना घडतात.
- अमित काळे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com