स्थलांतरणाच्या काळातही सुखरूप प्रसूती

स्थलांतरणाच्या काळातही सुखरूप प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जिल्हा रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी कामासाठी गेल्या वर्षभरापासून विविध विभागांचे स्थलांतर प्रक्रिया सुरू आहे. असे असतानादेखील या स्थलांतराच्या कालावधीत ठाणे-पालघर जिल्ह्यातून प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर मातांची यशस्वी प्रसूती करण्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने भर दिला आहे. त्यानुसार गेल्या वर्षभरात जिल्हा रुग्णालयात दोन हजार ७०० प्रसूती पार पडल्या असून यामध्ये ९० टक्के या प्रसूती जोखमीच्या असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे स्थलांतरणाच्या काळातही गरोदर मातांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील गोरगरिबांचे हक्काचे असलेले ठाणे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय कात टाकत आहे. ते रुग्णालय पाडून त्याच ठिकाणी ९०० बेड्सचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहत आहे. यामध्ये ५०० बेड्सचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० बेड्सचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे. मध्यंतरी या जीर्ण झालेल्या इमारती पाडून तेथे नवे रुग्णालय उभारण्याची शासनाने परवानगी दिली असून आता त्याचे पाडकाम हाती घेण्यात आलेले आहे.


------------------------
ठाणे, पालघर जिल्ह्यासाठी वरदान
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ ठाणे शहराबरोबर पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी, ग्रामीण आणि शहरी भागातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्या जातात. जिल्ह्यात कुटीर ग्रामीण अथवा उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती विभाग आहे; मात्र प्रसूतीच्या दिवसात बाळ आणि आईला धोका निर्माण झाला तर प्रसूती सुखरूप होण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय उत्तम पर्याय असतो. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०२२ ते आतापर्यंत सुमारे तीन हजार शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सचिन घोलप यांनी दिली.

.......................................

जिल्हा रुग्णालयात वर्षभरात दोन हजार ६४४ प्रसूती झाल्या आहेत. यापैकी एक हजार ३७८ सिझर आणि एक हजार २६६ नैसर्गिक प्रसूती झाल्या आहेत. १ हजार ८१ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करवून घेतली आहे.
- डॉ. सचिन घोलप, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय ठाणे.

……………………
ठाणे, पालघर जिल्ह्यातील जोखमीच्या प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते. प्रसूतीनंतर आई आणि बाळाची योग्य ती काळजी विभागाचे डॉक्टर आणि कर्मचारी घेत असतात. आता सुपरस्पेशालिटी जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले असून, वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या शासकीय इमारतीत प्रसूतिगृह बांधले आहे. या ठिकाणी नवजात अर्भकांसाठी असणाऱ्या अतिदक्षता विभागात एनआयसीयू; तर मोठ्या मुलांसाठी पीआयसीयूची सोय ठेवली जाणार आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com