नवी मुंबई मेट्रोच्या खर्चात २९१ कोटींची वाढ!

नवी मुंबई मेट्रोच्या खर्चात २९१ कोटींची वाढ!

नवीन पनवेल, ता. २ (वार्ताहर) ः नवी मुंबईतील मेट्रोचे काम सुरू होऊन बारा वर्षे होऊन गेली आहेत, पण अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. विलंब झाल्यामुळे मेट्रोच्या एकूण खर्चात २९१ कोटी रुपयांची वाढ झाली असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. अशा प्रकल्पात अभ्यास करून योग्य नियोजन न झाल्याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या कंत्राटदारांनी सिडकोची फसवणूक केली आहे, त्यांना काळ्या यादीत टाकत दंड आकारणे आवश्यक आहे, असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले.

१ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. याला आता १२ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही हे काम पूर्ण झाले नाही. सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या बेलापूर ते पेंधर हा मार्ग ११.१० किलोमीटर असून एकूण यात ११ मेट्रो स्थानके आहेत. सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ चा अपेक्षित खर्च ३०६३.६३ कोटी होता. जी कागदपत्रे दिली आहेत, त्या अनुषंगाने एकूण रक्कम ३३५४ कोटी होत आहे. यापैकी २,३११ कोटी दिले असून शिल्लक रक्कम १,०४३ कोटी देणे आहे. या खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ झाल्याचे उघड झाले आहे, परंतु सिडको प्रशासनाने विलंब करणाऱ्या एकाही कंत्राटदाराला दंड आकारला नाही किंवा त्यांना काळ्या यादीत टाकले नाही.

या कामात विलंब होऊनही कंत्राटदारावर कुठल्याही प्रकारचा दंड न आकारल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सिडको प्रशासनाने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. विशेष म्हणजे मेट्रो कामाच्या खर्चात २९१ कोटींची प्राथमिक वाढ झाल्याची माहिती कागदपत्रांवरून लक्षात येते. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सिडको प्रशासनाकडे नवी मुंबई मेट्रो संबंधित विविध माहिती १६ फेब्रुवारी २०२३ रोजी मागितली होती. सिडको प्रशासनाने २६ एप्रिल २०२३ रोजी याचे उत्तर पाठवले आहे. यासंदर्भात सिडकोचे जॉइंट एम. डी. कैलास शिंदे व जनसंपर्क अधिकारी प्रिया राताम्बे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
---
एप्रिलपर्यंत होती डेडलाईन
सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ केव्हा सुरू होईल याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. मेट्रो स्टेशन ७ ते ११ मधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित स्टेशन १ ते ६ चे काम पूर्ण करून पूर्ण मार्ग एप्रिल २०२३ पर्यंत प्रवाशांकरिता सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले होते, पण अद्यापही हा मार्ग सुरू झाला नाही.
--
कंत्राटदार बदलले
कंत्राटदार मेसर्स सजोस, महावीर, सुप्रीम या कंत्राटदारांच्या आर्थिक कमकुवत स्थितीमुळे काम पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यामुळे दोन्ही कंत्राट १ फेब्रुवारी २०१७ रोजी रद्दबातल करण्यात आले. त्यानंतर सिडकोने स्थानक १ ते ६ चे उर्वरित काम मेसर्स प्रकाश कॉस्ट्रोवेल, स्थानक ७ ते ८ मेसर्स बिल्ट राईट, स्थानक ९ व ११ चे काम मेसर्स युनीवास्तू आणि स्थानक १० चे काम मेसर्स जे कुमार यांना देण्यात आले.
---
परवानगीचा घोळ
सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गिका क्रमांक १ च्या मार्गात वीजवाहक टॉवर आणि तारांचा अडथळा होता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून परवानगी उशिराने प्राप्त झाली. रेल्वे मार्ग हा बेलापूरजवळ सायन- पनवेल महामार्गाला छेदत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी, तसेच राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे मंडळ आणि महामार्ग पोलिस खात्याची परवानगी मिळण्यास विलंब लागल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com