कार्यादेश नसतानाही नालेसफाईचे काम

कार्यादेश नसतानाही नालेसफाईचे काम

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात ८ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे नेते स्वप्नील महिंद्रकर यांनी यासंबंधी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता, यात ही माहिती उघडकीस झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. नालेसफाईच्या कामासाठी कार्यादेश नसतानाही ठेकेदारांनी काम केल्याचे यात समोर आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाकरिता २०२२-२०२३ या वर्षासाठी सुमारे ८ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती, पण आजपर्यंत यासाठी कार्यादेश पारित करण्यात आलेला नाही. या कामासाठी कार्यादेश नसतानाही ठेकेदारांनी नालेसफाईची कामे केली. या नालेसफाईचे काम हे विशेष स्वरूपाचे नसूनही सदर काम विशेष स्वरूपाचे असल्याचे दाखवण्यात आले. संबंधित कामात १९ टक्क्यांचा ट्रेंड रेट असूनही हे काम ट्रेंड किमतीनुसार करण्यात आलेले नाही. शिवाय नालेसफाईच्या कामात निविदेमधील अटीनुसार नाल्यातून काढलेल्या गाळाचे मोजमाप, गाळांचे फोटो, नालेसफाई काम सुरू करण्यापूर्वीचे व काम सुरू असतानाचे फोटो, चित्रफीत, गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची माहिती, नालेसफाई करणाऱ्या कामगारांची यादी, कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे, अशी माहिती महिंद्रकर यांनी दिली.
..........
घनकचरा विभागाचे अधिकारी ठेकेदारांशी संगनमत करून नालेसफाईच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहेत. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी आयआयटीसारख्या संस्थेच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामाचे परीक्षण केले पाहिजे. तसेच नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक तसेच निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद केली पाहिजे.
- स्वप्नील महिंद्रकर, मनसे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com