
दृष्टीक्षेप
बौद्धजन पंचायत समितीचा वर्धापन दिन
मालाड (बातमीदार) ः बौद्धजन पंचायत समिती ही कोकणातील बौद्धांची मुख्य संघटना असून २५ मे रोजी या संस्थेचा ८२ वा वर्धापन दिन संस्थेचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परळ भोईवाडा येथील संस्थेच्या कार्यालयात झाला. या वेळी झालेल्या मध्यवर्ती कौन्सिलच्या सभेत साडेआठशे शाखांमधील अध्यक्ष, चिटणीस तसेच गटप्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या बैठकीत वार्षिक अहवाल व अंदाजपत्र याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. शाखा सभासद वाढीव वर्गणी व बौद्धचार्यांच्या मानधनाचे वाढीव दरही सर्वानुमते सहमत करण्यात आले. या वेळी ३० शाखा पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते मांडली. २५ मे १९४१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खार येथे महार ज्ञाती पंचायत समितीची स्थापना केली होती. धर्मांतरानंतर या समितीचे बौद्धजन पंचायत समिती असे नामांतर करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त समितीच्या कार्याचा आढावा घेताना आनंदराज आंबेडकर यांनी सातमजली इमारत लवकरच पूर्ण होण्याचे संकेत दिले. या वेळी समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे तसेच सर्व प्रमुख कार्यकर्ते व उपसमित्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
‘प्रातःस्वर’ची आज मैफल
मुंबई ः दिवसाच्या विशिष्ट वेळी आणि ठराविक ऋतूला वाहिलेली रागदारी हेच भारतीय शास्त्रीय संगीताचे वेगळेपण आहे. सकाळच्या अशाच सुरेल रागांना वाहिलेल्या प्रातःस्वर या पंचम निषाद प्रस्तुत मैफलीच्या १२९ व्या भागात कोलकाता स्थित ख्यातनाम सरोदवादक पंडित नरेंद्रनाथ धर यांच्या कलेचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. त्यांना तबल्यावर साथ देण्यासाठी मुकुंद देव उपस्थित राहणार आहेत. ही मैफल रविवारी (ता. २८) सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलाप्रांगणात संपन्न होणार आहे. या मैफलीसाठी तिकीट आकारले जाणार नसून ती सर्वांसाठी खुली आहे. या कार्यक्रमाला रित्विक फाऊंडेशनचे विशेष सहाय्य लाभले आहे. १७ वर्षांपूर्वी पावसाळ्याचे चार महिने वगळता दर महिन्याला पंचम निषाद संस्थेने प्रातःस्वर ही सकाळच्या रागांची मैफल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलाप्रांगणात सुरू केली. पंचम निषाद संस्थेचे संस्थापक, संचालक शशी व्यास यांच्या मेहनतीने या मैफलीने थोड्या कालावधीतच यश संपादन केले आहे. ऑक्टोबर ते पुढील वर्षीचा मे महिना यादरम्यान दर महिन्याच्या एका रविवारी प्रातःस्वर ही सकाळच्या रागांची मैफल सादर केली जात असून या मैफलीत ज्येष्ठ व नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन
मालाड (बातमीदार) ः शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर शाळेच्या शैक्षणिक वर्ष १९५८/५९ ते १९६३/६४ या पहिल्या सहा वर्षांत शालांत परीक्षा (जुनी अकरावी) झालेल्या सर्व ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्कर्ष मंदिर शाळेच्या मामलतदार वाडी येथील सभागृहात रविवारी (ता. २८) सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान शाळेच्या स्मार्ट क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. स्नेहसंमेलनास उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी ०२२३५१३५४४७ अथवा ०२२३५१३५४४८ अथवा ९८२०८२२८९७ या फोनवर संपर्क करावा, असे आवाहन विश्वनाथ प्रभाकर मेहेंदळे यांनी केले आहे.