
वर्षभराच्या धान्य खरेदीला वेग
नवीन पनवेल, ता. २७ (वार्ताहर)ः साधारणपणे विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यानंतर वर्षभरासाठी लागणारे धान्य खरेदीकडे नागरिकांचा कल असतो. अशातच यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने साठवणुकीच्या धान्यखरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती, परंतु मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने गहू, डाळीच्या दरात वाढ झाली असताना खरेदीला वेग आला आहे.
रब्बीतील शेतमाल काढणीनंतर शेतकरी आर्थिक निकड, साठवणुकी अभावी धान्य बाजारात विक्रीसाठी आणतात. मागणी आवक दोन्ही बरोबर असल्याने किफायतशीर दराने वर्षभराचे धान्य खरेदी करणे कामगारांना, कष्टकरी नोकरदारांना शक्य होते. त्यामुळे एप्रिल, मे मध्ये धान्य खरेदीला वेग येतो; मात्र राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकाची काढणी लवकर झाली आहे. यामुळे गहू ओला असण्याची शक्यता असून त्याचा रंग आणि पोषकतेवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे धान्यखरेदीचा महिना असताना बाजारात शांतता होती. आता ऊन तापू लागल्याने ग्राहकांची बाजारातील वर्दळ वाढली आहे.
---------------------------------------
मागणीच्या तुलनेत आवक कमी
सध्या गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातून गव्हाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. पावसामुळे गव्हाचे उत्पादन कमी झालेले असले तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भाव वाढू लागले आहेत. आठ दिवसांत गव्हाच्या दरात प्रतिकिलो २ ते ५ रुपयांची; तर तूरडाळीच्या दरात ५ रुपयांची वाढ झालेली आहे. तूरडाळ ठोक बाजारात १३० ते १३५ रुपये किलो; तर गहू प्रतिकिलो ३२ ते ४५ रुपये झाला आहे.
------------------------------------------
धान्याचे दर रुपयांमध्ये (होलसेल)
गहू - ३२ ते ३८
ज्वारी - ३२ ते ३५
बाजरी - ३० ते ३५
तूरडाळ - १३० ते १३५
मूगडाळ - १०० ते १०२
हरभरा डाळ - ६२ ते ६५
मसूर डाळ- ७२ ते ७५
----------------------------------------
पावसाळ्यापूर्वी धान्यखरेदीची लगबग सुरू झाली आहे. थोड्या फार प्रमाणात दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहक नाखूश आहेत, परंतु मालाला उठाव आहे. मोठ्या प्रमाणात मालाची विक्री होत आहे.
- शेखर सूर्यवंशी, किराणा माल विक्रेते, कळंबोली