
२७ अतिधोकादायक इमारतींची वीज-पाणी जोडणी कापली
मुंबई, ता. २७ ः पावसाळ्यात अतिधोकादायक ठरू शकणाऱ्या २७ इमारतींचे वीज आणि पाण्याची जोडणी पालिकेतर्फे कापण्यात आली आहे. १९३ इमारती धोकादायक झाल्याने जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. ८२ इमारती रिकाम्या केल्या गेल्या आहेत. १०१ इमारतींचा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात येते. त्याअंतर्गत अतिधोकादायक आढळणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याबाबत पालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात येते. काही वेळा रहिवासी न्यायालयात दाद मागतात. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने पालिका प्रशासनाला कार्यवाही करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात अशा इमारती अथवा तिचा काही भाग कोसळून जीवितहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे रहिवाशांनी अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा यांनी केले आहे.
पालिका पावसाळ्याआधी सर्वेक्षणाद्वारे अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करत असते. त्यात मोठी दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींचा समावेश ‘सी-२’ करून तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना करण्यात येते. जीर्ण इमारतींचा समावेश ‘सी-१’ म्हणजेच ‘अतिधोकादायक’ श्रेणीत करून त्या तात्काळ रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात येतात. नोटीस बजावूनही इमारत रिकामी न केल्यास वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येते. दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील स्थिती
एकूण अतिधोकादायक इमारती ः ४२९
पालिकेकडून पाडण्यात आलेल्या ः १९३
न्यायप्रविष्ट प्रकरणे ः १०१
रिकाम्या करण्यात आलेल्या इमारती ः ८२
वीज-पाणी कापलेल्या ः २७
---
धोकादायक इमारती
शहर ः ३२
पूर्व उपनगर ः ६५
पश्चिम उपनगर ः १२०